पशुपक्ष्यांच्या हालचालीवर बळीराजाचे लक्ष
By admin | Published: May 25, 2015 02:08 AM2015-05-25T02:08:13+5:302015-05-25T02:08:13+5:30
सध्या मे हिटच्या तडाख्यात सापडलेल्या जीवसृष्टीला पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो.
वर्धा : सध्या मे हिटच्या तडाख्यात सापडलेल्या जीवसृष्टीला पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो. पण पक्षी महिन्याच्या मध्यानंतरच पावसापासून बचाव करण्यासाठी झाडावर आपली घरटी बांधण्याच्या तयारीला लागतात. पक्ष्यांची घरटी बांधण्याची वेळ आणि पद्धती यावरून पावसाचा अंदाज फार पूर्वीपासून शेतकरी घेत असतात. त्यामुळे पक्ष्यांचे घरटे आणि हालचालींवर बळेरेराजा लक्ष ठेवून आहे.
शेतकरी शेतीच्या मशागतीसोबतच पशुपक्ष्यांच्या हालचालीवर नेहमीच बारीक लक्ष ठेऊन असतो. त्यांच्या हालचालीवरुन पावसाचा आणि एकंदरीतच निसर्गाचा अंदाज बांधला जातो. त्यातील बहुतांश अंदाज अचूक ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. टिटवी पक्ष्याने नदीनाल्याच्या काठापासून अंडी दूर ठेवली, तसेच कावळ्यांनी आपली घरटी झाडाच्या मध्यावर बांधली तर पावसाळा जास्त होईल, असे संकेत असतात. सध्या पक्ष्यांनी घरटे बांधण्याची लगबग सुरू केली असून, निवारा व अंडी ठेवण्याची व्यवस्था केल्या जात आहे. घरट्याच्या उंचीवरून पाऊस किती येईल याचा अंदाज बांधला जातो.
कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या हालचाली हा पावसाच्या आगमनाचा शुभ संकेत समजल्या जातो. कावळ्याने घरटे झाडाच्या शेंड्यावर बांधल्यास पावसाळा असमाधानकारक, मध्यभागी तयार केल्यास पाऊस समाधानकारक समजण्यात येतो. यासोबतच निंबाच्या झाडांना जास्त प्रमाणात निंबोळ्या लागल्या तर हंगाम चांगला येईल, असा तर्कही अनुभवी शेतकरी देतात. तसेच सुरगण हा पक्षी घरटी बांधण्यात तरबेज असतो. त्याने जर भरपूर घरटी बांधली तर पाऊस जास्त येईल असे समजले जाते. पक्ष्यांना वातावरणाचा अंदाज दूरवरून येत असतो. परंतु शेताभोवतालची झाडेच सध्या तोडल्या जात असल्याने शेतशिवारात पक्ष्यांची घरटी पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे.(शहर प्रतिनिधी)