बापू कुटीला शिंदुल्यांच्या फांद्यांचा आधार
By admin | Published: June 23, 2014 12:14 AM2014-06-23T00:14:33+5:302014-06-23T00:14:33+5:30
पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या असलेल्या बापू कुटीवर विपरित परिणाम होतो. या पावसाच्या पाण्यापासून बचावाकरिता आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पावसाळ्यात शिंदुल्यांच्या फांद्या
पावसापासून संरक्षण : पूर्वीपासून हीच पद्धत अस्तित्वात
सेवाग्राम : पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या असलेल्या बापू कुटीवर विपरित परिणाम होतो. या पावसाच्या पाण्यापासून बचावाकरिता आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पावसाळ्यात शिंदुल्यांच्या फांद्या रक्षणाकरिता लावण्यात येतात. ही पद्धत आजही कायम असल्याने बापूकुटीला शिंदुल्यांच्या फाद्यांचा आधार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आजचे सेवाग्राम पूर्वीचे शेगाव आडवळणाचे आणि खेडे गाव. महात्मा गांधी वर्धेला आले असता ग्रामीण लोकांची सेवा आणि कार्य करण्याच्या हेतूने ते येथे राहायला आले. १९३६ मध्ये महात्मा गांधी गावात वास्तव्यास आले. यावेळी गावकऱ्यांनी बापूंच्या कार्यास सहकार्य दर्शविले. शेगावात राहण्याचा निर्णय झाल्यानंतर आदी निवास, बापू कुटी, कार्यालय, आखरी निवासाची निर्मिती करण्यात आली.
बापूंच्या तत्वानुसार झोपड्या बनविण्यात आल्याने कुड, माती, बांबू, बल्ली, बोऱ्या व कवेलू या स्थानिक साहित्याचा वापर करण्यात आला. या गावामध्ये शिंदूल्यांच्या झाडांचे वन होते. रस्त्याच्या दुतर्फा ते आजही दिसून येते. याचा उपयोग विविधांगी होतो. आश्रमात बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी याच्या चटया बनविल्या जात होत्या. परिसरातील सर्वच वास्तू कुटी मातीच्या व कुडाच्या असल्याने पावसाळ्यात धोका निर्माण होत होता. तेव्हा भिंतीचे संरक्षण करण्यासाठी पानोळ्यांच्या (फांदी) फांद्या लावल्या जात होत्या. बापू कुटीमध्ये भिंतीवर या झाडाचे चित्रही दिसून येते. आजही पावसाळा सुरू झाला की भिंतीच्या संरक्षणासाठी फांद्या लावण्यात येतात. त्या कामात सध्या कामगार व्यस्त असल्याने दिसून येत आहे. पावसाचे दिवस संपतातच ही पाने पुन्हा काढण्यात येणार असल्याचे आश्रम प्रतिष्ठानने सांगितले आहे.(वार्ताहर)