वर्धा : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक कमी झाल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्ष, नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सत्वपरीक्षा घेणारी ठरणार आहे.
२०१४ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये २ लाख १५ हजार ७८३ मतांचा फरक होता. हाच फरक २०१९ च्या निवडणुकीत जवळपास २८ हजार मतांनी कमी होऊन १ लाख ८७ हजार १९१ वर आला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ३७ हजार ५१८, तर काँग्रेसचे सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार ७३५ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत जय आणि पराजयामधील मतांचे अंतर काही प्रमाणात कमी झाले होते. त्यामुळे यावेळी मतदार कुणाची हमी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१९ मध्ये रामदास तडस यांना झालेल्या एकूण मतदानाच्या ५३.९२ टक्के, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी चारुलता टोकस यांना ३६.४७ टक्के मते मिळाली होती. या दोघांमध्ये १७.४५ टक्के मतांचा फरक होता. त्यामुळे यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
सर्वात कमी मतांनी झालेले विजय
२००४ च्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा केवळ ३ हजार १८८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी रिंगणातील उर्वरित पाच उमेदवारांना ५ हजारांपेक्षा जस्त मते मिळाली होती. तत्पूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसच्या प्रभा राव यांनी भाजपाचे सुरेश वाघमारे यांचा ७ हजार ५९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता मेघे यांनी १ लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती, हे विशेष.