लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने कोरोनाकाळात घरी राहून त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुक्त श्वास घेण्यासाठी जलाशयाकडे धाव घेतली आहे. पण, या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून अनेकांच्या पार्ट्याही रंगत असल्याने कारोनाच्या उपाययोजना म्हणून गर्दीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहे. आता जलाशयावर जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन वाहनेही जप्त केली जाणार आहे.गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. सततच्या पावसामुळे रिधोरा, पंचधारा, निम्न वर्धा, महाकाळी व बोरधरण या जलायशासह पवनार येथे पाण्याचा प्रवाह सुरु आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलाशयावर गेल्यानंतर पाण्यात पोहणे, त्या ठिकाणी धिंगामस्ती, आर्ट्यापार्ट्या करण्याचेही प्रमाण वाढले आहे. सुटीच्या दिवशी या ठिकाणी जत्राच भरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने, ठाणेदार सुनील गाढे यांनी प्रकल्पांना भेटी देत पाहणी केली. जलाशावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून त्या परिसरातील मार्गावर चौकी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकीतील कर्मचारी येणाºया-जाणाºयांवर वॉच ठेवणार असून जलाशयाकडे जाणाºयांवर दंडात्मक कारवाई करुन वाहनही जप्त करणार आहे. त्यामुळे आता जलाशयाकडे जाणे हे चांगलेच महागात पडणारे आहे.अनेकांच्या उत्साहावर विरजणस्वातंत्र्यदिनी सुटी राहत असल्याने या जलाशयांवर जाणाºयांची संख्या अधिक असते. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुटी आल्याने अनेकांनी जलाशयावर जाण्याचे बेत आखले आहे. त्यासंदर्भातील काही तयारीही चालविली आहे पण, आता प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगरला जाणार असल्याने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. त्यामुळे या दिवशी जायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होणार आहे.वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या धरणांवर जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. त्यानंतर जलाशयावर जाणाºयावर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी फौजदारी कारवाई सुद्धा केली जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.
सावधान..! धरणावर गेल्यास होईल दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:00 AM