लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान तब्बल ५० दिवस कोरोनाला रोखणाऱ्या वर्धा जिल्ह्यावर सध्या मोठे संकट ओढावले आहे. कोरोना पॉझिटिव्हीटीत वर्धा राज्यात द्वितीय स्थानी पोहोचला असून ही बाब प्रत्येक वर्धेकराच्या अडचणीत भर टाकणारी आहे. भविष्यातील संकट लक्षात घेवून आता जिल्हा प्रशासनाने नवीन रणनिती आखली असून वर्धा जिल्ह्यात पुन्हा नव्या जोमाने खबरदारीच्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे यात पोलीस विभागाचे सहकार्य घेतले जाणार असून आता पोलीस विभाग बेशिस्तांना शिस्त लावणार आहे.कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी मंगळवारी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच बैठकीदरम्यान वर्धा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर राज्यात द्वितीय स्थान पटकाविणारा असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात कोरोना बाबत खबरदारीच्या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचना केंद्रस्थानी ठेवून गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांसह घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना अनुसरून पोलीस विभागानेही नव्या जाेमाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे पुढील १५ दिवस वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडून काेरोना संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस विभाग करून घेणार आहे. त्यामुळे बेशिस्तांनी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे.
पॉझिटिव्हीटी दरात वर्धा राज्यात द्वितीय स्थानी असून नागरिकांनी घाबरून नये. पण प्रत्येक नागरिकाने अधिक लक्ष राहून खबरदारीच्या उपाय योजनांची तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून पुढील १५ दिवस शासनाच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पोलीस विभाग सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांसह मास्कचा वापर न करणारे तसेच विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. तशा सूचना आपण सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.
कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत कोविड चाचणी करून घ्यावी. कोरोनाकाळात वर्धेकरांचे यापूर्वी चांगले सहकार्य मिळाले असून आताही सहकार्याची अपेक्षा आहे.- डॉ. सचिन ओंम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. वर्धा.