अडचणींना धैर्याने सामोरे जा!
By Admin | Published: October 11, 2015 12:28 AM2015-10-11T00:28:20+5:302015-10-11T00:28:20+5:30
अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे.
वर्धा : अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे मनोबल उंचावून आलेल्या अडचणीच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी धैर्याने पुढे येण्याचे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
नागठाणा रोडवरील अग्निहोत्री महाविद्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, दिलीप अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, तहसीलदार राहुल सारंग, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड आदी उपस्थित होते.
तिवारी म्हणाले शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या त्यांच्या लाभाचा फायदा करून घेण्यासाठी पुढे यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला. आपण शिकलो, संघटीतही झालो; पण परिस्थितीशी संघर्षासाठी आपण पुढे येत नाहीत, याची खंत वाटते. अडचणीच्या परिस्थितीवर मात करण्याची धमक आपल्या मनगटात असून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण धैर्याने पुढे यायला हवे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी हिताच्या जलयुक्त शिवार अभियानाची लोकचळवळ उभारली. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान गावोगावी राबवून शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे, ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. जिल्ह्याचे चित्र पालटण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी संकल्प करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळत असलेला लाभ, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण योजना याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. अग्निहोत्री यांनी दैविक, भौतिक आणि आत्मिक परिस्थितीचे वर्णन करून शेतकरी अडचणीतून बाहेर पडावा यासाठी येणाऱ्या अडचणींवर नियोजन करून स्थिती बदलण्यासाठी सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. शेतीप्रधान देशात शेतकरी जगला तरच देशाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संचालन प्रफुल दाते यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)