नदीच्या सौंदर्यीकरणाला आश्रमवासीयांचा विरोध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:09 PM2018-02-25T22:09:18+5:302018-02-25T22:09:18+5:30
पर्यटनाच्या माध्यमातून धाम नदीच्या सौंदर्यीकरणाला भरपूर निधी मिळाला. त्यातून होणाऱ्या विकास कामाला आमचा विरोध नाही.
ऑनलाईन लोकमत
पवनार : पर्यटनाच्या माध्यमातून धाम नदीच्या सौंदर्यीकरणाला भरपूर निधी मिळाला. त्यातून होणाऱ्या विकास कामाला आमचा विरोध नाही. ब्रह्म विद्या मंदिर (परमधाम आश्रम) हे एक तिर्थस्थळ, प्रेरणास्थळ आहे. याची महती कायम ठेवणे गरजेचे आहे. यासाठी परिसरात शांती कायम राहावी. सोबतच परिसराची स्वच्छता व धाम नदीचे नैसर्गिक सौंदर्यंही टिकून राहावे, असे मत ब्रह्म विद्या मंदिर परमधाम आश्रमचे गौतम बजाज यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत व्यक्त केले.
हे तिर्थस्थळ असल्याने त्याचे पर्यटनस्थळ होता कामा नये, हीच आमची अपेक्षा आहे. समाधी स्थळ व परिसर आहे त्याच स्थितीत निटनेटका ठेवावा. समाधीवर कपडे वाळत टाकणे हे प्रकार होऊ नये. धाम नदी परिसरात नदीच्या प्रवाहाशी कुठलीही छेडछाड होता कामा नये, ही विनोबांची कायम इच्छा होती; पण आता त्या स्थळाला प्रेरणा ऐवजी प्रेक्षणीय स्थळ बनवायचे असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी व प्रकल्प प्रमुख सुभाष राणे यांच्याशी चर्चा झाली. नदी पात्रात सुमारे ५०-६० फुट मुरूम टाकून पात्र लहान केले आहे. खडकही मुरूम टाकून बुजविले आहे. मुरूम २५-३० फुटापर्यंत टाहावा, हे जिल्हाधिकारी व सुभाष राणे यांना पटले. याबाबत नवीन आखणी होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना संबंधितांनी कंत्राटदाराला दिल्यात.
गैरसमजांमुळे ग्रामस्थ तथा आश्रमवासी यांच्यात दुफळी निर्माण होईल. सेवाग्राम आश्रमला संमेलन सुरू असल्याने तेथे अनेक सर्वोदयी आले आहेत. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंग, हिराभाई महोदय, करुणा बहन यांनी आश्रमला भेट दिली. त्यांच्याशी चर्चा झाली. कायदेशीर कृतीचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी सांगितले.