गप्प राहिल्यामुळेच लैंगिक अत्याचार फोफावतो

By admin | Published: March 2, 2017 12:30 AM2017-03-02T00:30:03+5:302017-03-02T00:30:03+5:30

सरकारी आकडेवारीनुसार लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एकूण स्त्रीयांपैकी ७२ टक्के स्त्रिया या गप्प राहतात.

Being sexually confronting sexual abuse | गप्प राहिल्यामुळेच लैंगिक अत्याचार फोफावतो

गप्प राहिल्यामुळेच लैंगिक अत्याचार फोफावतो

Next

इंद्रजीत खांडेकर : लैंगिक छळ विरोधी कार्यशाळा; विविध ठिकाणी कार्यशाळेतून युवतींमध्ये जागृती
वर्धा : सरकारी आकडेवारीनुसार लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एकूण स्त्रीयांपैकी ७२ टक्के स्त्रिया या गप्प राहतात. त्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढून पुढे तो सरासरी १७ महिलांना आपले सावज करतो, असे निरीक्षण महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्रामचे न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी नोंदविले.
प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय येथे राज्य महिला आयोग व रा.तु.म. नागपूर विद्यापीठ यांच्यावतीने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणीबाबत जागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. पहिल्या सत्रात ते साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. रंभा सोनाये तर उद्घाटक वर्धा शहर ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र शिरतोडे मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. खांडेकर म्हणाले, अगदी बालवयापासून मुलांना लैंगिक शिक्षण देवून समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. याची सुरुवात घरापासून व्हावी. महिलांनी कामाच्या ठिकाणी कधीही कुणाची बाजू घेऊ नये, अनेकदा याची परतफेड करावी लागते. त्यातून लैंगिक छळ उद्भवतो. शेवटी कुठल्याही छळाची तक्रार करुनच आपण तो प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे मुलींनी गप्प न राहता अत्याचाराविरुद्ध बोलायला शिकले पाहिजे, असे सांगितले.
ठाणेदार शिरतोडे म्हणाले, महिलांनी सोशल मिडीयाबाबत अधिक सजग राहावे, असे सांगून त्यासंबंधित गुन्हांची माहिती दिली. पोलिसांकडे येणारी लैंगिक छळाची ९५ टक्के प्रकरणे ही खोटी असतात.
कार्यशाळेच्या अंतिम सत्रात जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. अनिता ठाकरे यांनी विविध न्यायालयीन प्रकरणांचे दाखले देत अधिनयम २०१३ बाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी वर्धा जिल्हा पोलिसांच्यावतीने पोलीस शिपाई निलेश सडमाके, सचिन गाडवे, योगिता मसराम, सोनाली यांनी ‘सायबर दिंडी’ हे पथनाट्य सादर केले. कार्यशाळा आयोजनाची भूमिका डॉ. प्रा. अनिता देशमुख यांनी विशद केली. विविध सत्रांचे संचालन डॉ. सोनाली सिरभाते, डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ. रेखा बोबडे यांनी तर डॉ. धनंजय सोनटक्के, प्रा.अमोल घुमडे, डॉ. मालिनी वडतकर यांनी आभार मानले. प्रा. मदनमोहन विश्वकर्मा, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. प्रियराज महेशकर आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यावर कार्यशाळा
वर्धा - राज्य महिला आयोग, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर व औषधनिर्माण शास्त्र शिक्षण व संशोधन संस्था, बोरगाव(मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार कायद्याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र गंजीवाले तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. क्षिप्रा सिंघम, डॉ. मनीषा पुराणिक, साधना गौतम मंचावर उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. मनीषा पुराणिक यांनी केले. स्लाईड शोच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

पुलगाव - स्थानिक सुवालाल पाटणी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित कार्यशाळेत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ यावर मार्गदर्शन करण्यात आले. संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ या कायद्याबद्दल जाणीव व जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली.
प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या पदसिद्ध केंद्राध्यक्ष प्रा. डॉ. विद्या चन्ने यांनी केले. स्त्री संरक्षणाकरिता विशाखा अधिनियम २०१३ हा अस्तित्वात येण्याकरिता कारणीभूत ठरलेली परिस्थितीचे विश्लेषण केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुलगाव न्यायालय बार कॉन्सिलच्या सचिव अ‍ॅड. माधुरी तराळ होत्या.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लैंगिक छळ किंवा शोषण म्हणजे काय, याबाबत सविस्तर माहिती दिली. यात समाविष्ट बाबी, लैंगिक छळाबाबत प्रतिबंध, मनाई, निवारण, अंमलबजावणी, कायद्यातील कलमे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. भूषण रामटेके, नगरसेविका पुनम सावरकर, संस्था सचिव पूर्णिमा पाटणी उपस्थित होत्या. प्रा. विष्णु पवार, रामविजय राठोड, निशा सोमकुवर, कोमल काळे, आरती मोहेकर, प्रा. गवई, प्रा. गदरे व विद्यार्थी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Being sexually confronting sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.