जिल्हा कचेरीपासून हाकेच्या अंतरावर होत होता पेट्रोलचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:16+5:30
नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांनी स्वत: ग्राहक बनून या पेट्रोलपंपावर पेट्रोलचा काळाबाजार होतो काय याची पडताळणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देत चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री होत असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांनी या धक्कादायक प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पेट्रोलच्या काळाबाजाराचा विषय कळताच बड्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात राजपाल यांच्या पेट्रोलपंपाला सील ठोकण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महिलाश्रम भागातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देत संचारबंदीच्या काळात चढ्या दराने पेट्रोलची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार महिला नायब तहसीलदारांनी स्वत: ग्राहक बनून केलेल्या स्ट्रींग ऑपरेशननंतर पुढे आला आहे.
हा पेट्रोलपंप शहरातील नामवंत व्यावसायिक राजपाल यांच्या मालकीचा असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पेट्रोलचा काळाबाजार केला जात असलेल्या या पेट्रोलपंपाला सील ठोकण्यात आले.
राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरातील पेट्रोलपंप सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली आहे. तर सकाळी ११ नंतर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप वगळता इतर पेट्रोलपंप मालकांनी पेट्रोल व डिझेलची विक्री शहरात करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. परंतु, वर्धा-सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम येथील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर मालक व पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जिल्हा प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यावरही पेट्रोलची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांनी स्वत: ग्राहक बनून या पेट्रोलपंपावर पेट्रोलचा काळाबाजार होतो काय याची पडताळणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देत चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री होत असल्याचे पुढे आले.
त्यानंतर त्यांनी या धक्कादायक प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पेट्रोलच्या काळाबाजाराचा विषय कळताच बड्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात राजपाल यांच्या पेट्रोलपंपाला सील ठोकण्यात आले आहे.
बाटलीत साठवून ठेवायचे पेट्रोल
प्लास्टिकच्या बाटलीत अतिज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल देऊ नये, असा नियम आहे, शिवाय तसे फलकही प्रत्येक पेट्रोलपंपावर लावण्यात आले आहेत. परंतु, महिलाश्रम येथील राजपाल यांच्या पेट्रोलपंपावर पेट्रोलचा काळाबाजार करणारे प्लास्टिकच्या बाटलीत साठवून ठेवलेले पेट्रोल चढ्या दराने ग्राहकांना विकत होते.
कारवाई रोखण्यासाठी दबाव
नायब तहसीलदार बाळू भागवत हे या पेट्रोलचा काळाबाजार करणाऱ्या पेट्रोलपंपाला सील ठोकण्याची कारवाई करीत असताना त्यांनी ही कारवाई करू नये म्हणून त्यांच्यावर मोठा दबाव आणला जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले.