अल्लीपूर (वर्धा) : नागपूर ते पुणे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सला समृद्धी .महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या बसमध्ये अल्लीपूर येथील संजीवनी शंकरराव गोठे वय(२२) ही अल्लीपूर येथून पुण्याला जात होती.
संजीवनी हिला खाजगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती, ती जॉईन करण्यासाठी ती निघाली होती. या अपघातात तिच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर गावावर शोकाकळा पसरली आहे. संजीवनीची मोठी बहीण आहे ही पुण्यात जॉब करीत आहे तिचे वडील भारतीय जीवन विमाचे एजंट आहे व सोबत शेती करतात. तिची आई घरकाम करते.
बस विदर्भ ट्रॅव्हल्सची विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.