महेश सायखेडे
वर्धा : बारावीपर्यंत वर्धेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णनगर येथील तेजस रामदास पोकळे याने आपल्या कर्तूत्त्वाच्या जाेरावर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला. याच ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षाचे धडे घेत असताना त्याने महाविद्यालयीन कॅम्पसला पुढे जात मुलाखत दिली. याच मुलाखतीत त्याची बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी सिलेक्शन केले.
ही वार्ता कुटुंबियांना दिल्यावर तेजस वर्धेला परतला. कुटुंबियांसोबत काही दिवस घालवल्यावर तो शुक्रवारी पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने रवाना झाला. भरधाव ट्रॅव्हल्स बुलढाणा जिल्ह्यात एन्ट्री होत पुण्याच्या दिशेने रवाना होत असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला. याच अपघातात तेजस रामदास पोकळे याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तेजस हा शनिवारी नोकरीसाठी सिलेक्ट झालेल्या कंपनीत कर्तव्यावर रुजू होणार होता. पण त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घेतल्याने पोकळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. शिवाय वर्धेच्या कृष्णनगरात शोककळा पसरली आहे.
“काचेवर हात आपटत होते प्रवासी, मदत मिळेना; लहान बाळ डोळ्यासमोर बघता बघता...”
'तेजस'चे वडील करतात 'सूतारकाम'
तेजसच्या अपघाती मृत्यूमुळे पोकळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. तेजसचे वडील रामदास पोकळे हे सूतारकाम करून कुटुंबाचा गाढा हाकलतात. तर तेजसची आई सविता पोकळे या गृहिणी आहेत. तर तेजसची बहिण श्रावणी ही पिपरी (मेघे) येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे धडे घेत आहे.
अन् पोकळे कुटुंबातील चौघे झाले रवाना
नोकरीसाठी सिलेक्ट झालेल्या कंपनीत कर्तव्यावर रुजू होण्यासाठी वर्धेतून रवाना झालेल्या तेजस याचा महासमृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होताच तेजसचे वडील, आई, बहीण आणि काका असे पोकळे कुटुंबातील चौघे व्यक्ती शनिवारी पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाच्या दिशेने रवाना झाले.
“समृद्धी महामार्ग हा शापित झाला आहे, अनेकांचे अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”: संजय राऊत
वर्धेत पोहोचल्यावर गुरूवर्यांशी विविध विषयांवर केली होती चर्चा
कॉलेज कॅम्पसमध्ये मुलाखीत दिल्यानंतर बड्या कंपनीत नोकरीसाठी सिलेक्शन झाल्यावर वर्धेत परतलेल्या तेजस याने निम्म्याहून अधिक वेळ कुटुंबियांना दिला. तर उर्वरित वेळेपैकी काही वेळेची सवड काढून आपल्या दहावी आणि बारावीच्यावेळी मार्गदर्शन केलेल्या गुरूवर्यांना देत त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. या चर्चेत तेजस याने महाविद्यालयीन कॅम्पस मध्ये नोकरीसाठी बड्या कंपनीत सिलेक्शन झाल्याची माहितीही न विसरता गुरूवर्यांना दिली. तर तेजसच्या मृत्यूची वार्ता या गुरूवर्यांना मिळताच त्यांनी तेजसचे निवासस्थान गाठून पोकळे कुटुंबियांचे सांत्वन केले.
दत्तक घेतलेल्या ओव्हीसह आई अन् आजीही झाली गतप्राण
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या पिंपळखुटा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात वृषाली वनकर, शोभा वनकर आणि ओव्ही वनकर या तिघांचाही मृत्यू झाला आहे. मृतक वृषाली वनकर ही तेजस पेकळे याच्या आत्याची मुलगी असून मृतक शोभा वनकर या वृषालीच्या सासू आहेत. तर सुमारे एक वर्ष वयोगटातील ओव्ही हिला वृषाली आणि वृषालीच्या पतीने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते असे सांगण्यात आले.
--