Hinganghat Case : हिंगणघाट जळीत प्रकरणी दोन आठवड्यांत आरोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:00 AM2020-02-08T03:00:14+5:302020-02-08T03:01:45+5:30
Hinganghat Case : हिंगणघाट येथील महिला प्राध्यापिकेच्या जळीत प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे.
हिंगणघाट (वर्धा) : हिंगणघाट येथील महिला प्राध्यापिकेच्या जळीत प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. येत्या दोन आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
हिंगणघाट शहरात सोमवारी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या प्राध्यापिकेवर विकेश नगराळे या माथेफिरूने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीला वर्धा जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात ठेवण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ ते २० लोकांचे बयाण नोंदविले आहे. या प्रकरणात आरोपीने वापरलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
शासनाकडून ११ लाख
पीडित तरुणीवर नागपूर येथील आॅरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाने मुंबईतील बर्न इन्स्टिट्यूूटमधील डॉक्टरांची एक टीमसुद्धा पाठविली आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी उपचारासाठी शासनाकडून मदत मिळविण्यासाठी हालचाली केल्या. त्यानंतर शासनाकडून ४ लाख रुपये रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा झाले असून आणखी ११ लाख रुपये मंजूर केले आहेत.
पाच दिवसांनंतरही जिल्ह्यात या प्रकरणाची धग कायम आहे. शुक्रवारी आर्वी, पुलगाव आणि सेलू येथे मोर्चे काढण्यात आले. पीडित व आरोपी राहात असलेल्या गावात शुक्रवारी हिंगणघाट पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली.
उज्ज्वल निकम बाजू मांडणार
हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची बाजू न्यायालयात सुप्रसिद्ध विधिज्ञ ऊज्ज्वल निकम मांडणार आहेत. पीडितेच्या वतीने अॅड. निकम यांनी खटला चालवावा, अशी मागणी तिच्या आईने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेली होती.
स्वत: देशमुख यांनीच निकम यांना ही माहिती दिली व पिडितेच्या वतीने न्यायालयात आपण बाजू मांडावी, अशी विनंती केली. अॅड. निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की देशमुख यांची विनंती आपण मान्य केली आहे. आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी युक्तिवाद करू.
नागपुरातील अॅड. सत्यनाथन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित होती. सत्यनाथन यांनीही दुजोरा दिला होता. परंतु निकम यांची नियुक्ती झाली.
दशकाच्या मैत्रीत झाला घात
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर बरीच नवीन माहिती पुढे आली आहे. पीडित तरूणी व आरोपी एकाच गावचे आहेत. आरोपी हा तरुणीपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी हे दोघेही हिंगणघाटला सहप्रवासी होते. एकाच गावातून दररोज बसने ये-जा असल्याने दशकापासून त्यांची मैत्री होती. उच्च शिक्षणासाठी पीडिता वर्ध्याला गेल्यावर या मैत्रीत खंड पडला.
यादरम्यान विकेशचे लग्न झाले.
शिक्षण आटोपून पीडिता हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकविण्यासाठी रूजू झाली. या दरम्यान आरोपी विकेशने मैत्री कायम ठेवण्यासाठी पीडितेकडे आग्रह धरला होता. तीन महिन्यांपूर्वी पीडितेच्या पित्याने विकेशला समजविण्याचा प्रयत्न केला. यावरून तो चिडला होता. माझ्याशी व्यवस्थित वागत असताना वडिलांना माहिती का दिली यावरून विकेश चिडला होता. तेव्हापासूनच तो सूड घेण्याच्या मनस्थितीत होता.