दोन वर्षात रक्कम दुप्पट : वर्ध्यात ठगबाजांचा फंडा, अनेकांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:30 PM2021-10-13T17:30:01+5:302021-10-13T17:34:45+5:30

कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षात रक्कम दुपटीने मिळणार असे सांगून सुमारे शंभरावर नागरिकांसह बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना वर्धेत उघडकीस आली आहे.

Citizens lost Rs 38 lakh in the name of doubling the amount | दोन वर्षात रक्कम दुप्पट : वर्ध्यात ठगबाजांचा फंडा, अनेकांना लाखोंचा गंडा

दोन वर्षात रक्कम दुप्पट : वर्ध्यात ठगबाजांचा फंडा, अनेकांना लाखोंचा गंडा

Next
ठळक मुद्देअज्ञेय ॲग्रो कंपनीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षांत रक्कम दुप्पट करून देणार असल्याचे आमिष देत सुमारे शंभरावर नागरिकांसह बेरोजगारांना तब्बल ३८ लाख ६२ हजार ३३९ रुपयांनी गंडवून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी कंपनीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, जून २०१८ मध्ये दुष्यंत प्रमाेद चाफले याच्या ओळखीच्या आशिष वानखेडे रा.समतानगर, वैभव काळे यांच्याकडून अज्ञेय कंपनीने चांगली योजना आणली असून या कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षात रक्कम दुपटीने मिळणार असल्याचे सांगितले. या कंपनीचे कार्यालय पोस्ट ऑफीसकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाद चंदावार यांच्या घरी असल्याने युवकांनी कार्यालयात जात अधिकची माहिती घेतली. शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञेय अग्रो ॲण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नाशिक या कंपनीसह तब्बल ९ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जुलै २०१८ मध्ये पुन्हा प्रशांत धोटे, महेंद्र डेकाटे, रोशन क्षीरसागर, नितीन देशमुख, अश्विन तवाडे, शुभम मुंजेवार, आशिष वानखेडे, वैभव काळे यांच्यासह काही युवक नाशिक येथे कंपनीचा प्लांट पाहण्यास गेले होते. कंपनीचे सीईओ रमेशकुमार जोनवाल यांनी कंपनीचा प्लान समजावून सांगितला. ३५०० आणि ६००० रुपये अशा दोन पॅकेजमध्ये हा प्लान असून कुठलाही एक प्लान घेतल्यास तुम्हाला कंपनीत जॉयनिंग मिळेल, असे त्यांनी सांगितले. रक्कम गुंतविल्यास तुम्हाला अनेक फायदे होतील, असे सांगण्यात आले.

ऑगस्टमध्ये वर्ध्यातील विद्यादीप सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. तब्बल १२०० च्यावर नागरिक व गुंतवणूकदार उपस्थित होते. प्रत्येक मेंबरकडून १००० रुपये मेंबरशिप म्हणून घेण्यात आले व १ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करण्यात आले. मात्र, काही दिवसांनी कुठलाही परतावा मिळाला नसल्याने नागरिकांनी कंपनीच्या सीईओला विचारणा केली असता परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

आशीष झाडे याने २०१८ मध्ये लाखो रुपये भरले आहेत. तसेच वैभव काळे यानेदेखील ४ लाख रुपये असे एकूण १४ लाख ९२ हजार रुपये कंपनीत गुंतविलेले आहे. आशिषच्या पत्नीच्या बँक खात्यात १ लाख २१ हजार रुपये व आशिषच्या बँक खात्यात ४ लाख २० हजार रुपयांचा परतावा झाला असून ९ लाख ५० हजार ७६० रुपयांची रक्कम अजूनही परत केली नसून कंपनीने गंडविले आहे. अनेकांचे असे एकूण ३८ लाख ६३ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी रमेशकुमार जोनवाल, अनिता जोनवाल, रामसिंग जोनवाल, रमेशकुमार जोनवाल, रवींद्र पंडित, उशा मोहिते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Citizens lost Rs 38 lakh in the name of doubling the amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.