वर्धा: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सलग नवव्या लोकसभेपर्यंत वर्धालोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला होता. मात्र, १९९१ मध्ये दहाव्या लाेकसभा निवडणुकीत प्रथमच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराने काँग्रेसला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराने बाजी मारली होती.
आत्तापर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी लोकसभेत नेतृत्व केले आहे. त्यात श्रीमन्नारायण बजाज, कमलनयन बजाज, जगजीवनराव कदम, संतोषराव गोडे, वसंतराव साठे, रामचंद्र घंगारे, विजयराव मुडे, दत्ता मेघे, प्रभा राव, सुरेश वाघमारे आणि रामदास तडस यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत येथून या ११ जणांनी खासदारकी मिळविली. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून ते १९८९ च्या नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांनी येथून सलग विजय मिळविला होता. त्यानंतर १९९१ मध्ये झालेल्या दहाव्या लाेकसभा निवडणुकीत मात्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला पहिल्यांदाच पराभूत केले होते.
१९९६ मध्ये अकराव्या लाेकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात प्रथमच येथून भाजप उमेदवाराने विजय मिळवीत मुसंडी मारली होती. मात्र, दोन वर्षानंतर १९९८ मध्ये झालेल्या बाराव्या आणि १९९९मध्ये झालेल्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने बाजी मारली होती. २००४ मध्ये झालेल्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने मुसंडी मारली, पण २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने हा मतदार संघ आपल्याकडे खेचून घेतला होता. त्यानंतर मात्र २०१४ मध्ये सोळाव्या आणि २०१९ मध्ये सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथून विजयी पताका कायम ठेवली आहे.
यंदा प्रथमच नसणार काँग्रेसचा उमेदवारआत्तापर्यंत झालेल्या १८ लोकसभा निवडणुकीत रिंगणात काँग्रेसचा उमेदवार राहात होता. काँग्रेस विरोधात इतर पक्षांचे उमेदवार राहात होते. मात्र, यावेळी प्रथमच काँग्रेस उमेदवार राहणार नसल्याचे संकेत आहे. राज्यात सध्या काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. आघाडीत वर्धा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार वर्धेच्या रिंगणात राहणार नसल्याची माहिती आहे.