देवळीतील वादग्रस्त नाली बांधकामाला पुन्हा सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:37 PM2024-11-27T16:37:03+5:302024-11-27T16:38:30+5:30
महामार्ग प्रशासनाचा प्रताप : नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविल्याचा होतोय आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : देवळीकरांच्या रोषाचे कारण ठरलेल्या वादग्रस्त नालीच्या बांधकामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याने महामार्ग प्रशासनाच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. महामार्ग प्रशासनाने देवळीकरांच्या तसेच शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालविल्याचा संताप व्यक्त केला आहे. केवळ कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी या चुकीच्या बांधकामाचा अट्टहास केला जात असल्याचा आरोप होत आहे.
महामार्ग प्रशासनाच्यावतीने देवळीत ३२ कोटींच्या खर्चातून पावणेचार किलोमीटर अंतरात सिमेंट रस्त्याचे तसेच नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील उड्डाणपूल ते विश्रामगृह, औद्योगिक वसाहत चौक, आठवडी बाजार चौक, बसस्थानक तसेच पुढे यशोदा नदीच्या बोगद्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु या मार्गावर ३० मीटर रुंदीची हद्द असतांना फक्त १० मीटरमध्ये रस्त्याचे व ३ मीटरमध्ये नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याने भडका उडाला आहे.
याशिवाय प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करून विश्रामगृह ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु संबंधित बांधकाम अरुंद रस्त्यात तसेच शेतकरी वर्गाच्या गैरसोयीचे असल्याने नागरिकांच्या रोषाचे कारण बनले. या रस्त्यावर कापूस मार्केट, धान्य मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, बैल बाजार, आठवडी बाजार, ग्रामीण रुग्णालय, खरेदी विक्री समिती तसेच ७ जिनिंग फॅक्टरी व औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक वाहनांची वर्दळ आहे. कापसाच्या हंगामात शेकडो गाड्या या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. नालीचे बांधकाम तोडण्याची तसेच रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वृत्तपत्रांनीसुद्धा ही बाब वारंवार उचलून धरून मागणीला वाचा फोडली आहे. याची दखल घेत महामार्ग प्रशासनाचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित जिचकार व अधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट रोजी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. नवीन इस्टीमेटनुसार सुधारित बांधकाम करणार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात पुन्हा त्याच जागेवर नालीचे बांधकाम सुरू करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
अभियंत्याची कानउघडणी
सुधारित इस्टीमेटनुसार रस्त्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले. पहिल्या भागात वर्धा मार्गावरील उड्डाणपूल ते तडस यांच्या खासगी आयटीआयपर्यंत २० मीटर रुंदीचे बांधकाम नियोजित आहे. यात १५ मीटरमध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम, ३ मीटरमध्ये पेव्हर ब्लॉक व २ मीटरमध्ये मातीचे काम केले जाणार आहे. शिवाय दुसऱ्या भागात तडस आयटीआय ते यशोदा नदीच्या बोगद्यापर्यंत १० मीटरमध्ये सिमेंट रस्ता, २ मीटरमध्ये पेव्हर ब्लॉक व २ मीटरमध्ये माती काम नियोजित आहे. नदीच्या बोगद्यापासून माती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती ते विश्रामगृहापर्यंतचे नाली बांधकाम तोडले जाणार नसल्याने, ही बाब जीवघेणी ठरली आहे. त्यामुळे माजी खासदार रामदास तडस संबंधित अभियंत्याची कानउघाडणी केली. ना. गडकरी यांनी न्यायाची भूमिका घेण्याची मागणी होत आहे.
"विश्रामगृह ते जोशी पेट्रोलपंप या दरम्यानचे एका बाजूचे नाली बांधकाम हे आहे त्या स्थितीत ठेवले जात आहे. या नालीची कनेक्टिव्हिटी करण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले."
- योगेश कुबडे, अभियंता.
"महामार्ग प्रशासनाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम एकसारखे तसेच मध्ये कोणताही अडथळा न ठेवता करण्यात यावे. रस्त्यात चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या नाल्या तोडून कामाला गती देण्यात यावी. यामध्ये कंत्राटदाराने कुचराई केल्यास त्याच्या एजन्सीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची शिफारस करणार आहे."
- रामदास तडस, माजी खासदार