वर्ध्यातील पोलीस शिपायाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:37 PM2020-09-02T22:37:58+5:302020-09-02T22:39:39+5:30
वर्धा : जिल्हा पोलीस दलातील दहेगाव ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विलास शंकर बालपांडे यांचा कोरोन विषाणू आजाराने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा पोलीस दलातील दहेगाव ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विलास शंकर बालपांडे यांचा कोरोन विषाणू आजाराने मृत्यू झाला. बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन मानवंदना देण्यात आली.
विलास बालपांडे हे दहेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतानाच २७ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना सेवाग्राम येथील कोविड सेंटरला भरती करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना हिंदी विश्वविद्यालयातील छात्रावास येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. विलास बालपांडे हे गडचिरोली पोलीस दलात १९९४ मध्ये दाखल झाले होते. गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली.
२००५ मध्ये आंतरजिल्हा बदली करुन ते वर्धा जिल्ह्यात आले. वर्धा जिल्ह्यात त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे कर्तव्य बजाविले आहे. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे आदींसह कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली.