लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ चा प्रकोपापेक्षाही सोशल माध्यमाव्दारे कोरोनाबाबत पसरविली जाणारी भीती अधिक तीव्र असल्याने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत धावाधाव सुरु आहे. कोरोना आजाराची ही भीती अनाठायी व अवास्तव असल्याचे मत वर्ध्यातील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी यापूर्वीही लोकमतच्या माध्यमातून व्यक्त केले. नुकताच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांनी संयुक्तरित्या केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार दिल्लीतील जवळपास २३ टक्के लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडी दिसून आली आहे. दिल्लीतील लोकसंख्या अंदाजे ३ कोटी असून त्यापैकी २३ टक्के म्हणजे जवळपास ६५ लाख व्यक्ती कोरोनाबाधित झाले असावे. यातील बहुतांश व्यक्ती कोणाच्याही न कळत किंवा रुग्णालयात न जाता बरेही झालेत. यातील केवळ ३ हजार ७०० व्यक्तींचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर फक्त ०.०५ टक्के निघतो. म्हणजेच यापूर्वी कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्के सांगितला जात होता त्यापेक्षाही वास्तविक मृत्यूदर फारच अत्यल्प असल्याचे निष्कर्षातून सिद्ध झाले. यावरुन जसजसा अँटीबॉडी सर्वे केला जाईल तसतसा मृत्यू दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता स्वरक्षणाकरिता खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना इतर आजारासारखाचकोरोना काही वेगळा भयावह आजार नसून इतर गंभीर आजारासारखाच असल्याचे मत व्यक्त होत आहे. देशात २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली असताना सुरुवातीला मृत्यू दर ३.४ टक्के सांगितला होता. जागतिक आरोग्य संघटनेने तेव्हाही कोरोना प्रमाणेच विलगीकरण, सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, पीपीई किटचा वापर आदी दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण होऊन शाळांसह इतर कार्यालये बंद केले होते. पण, सोशल मीडिया तेव्हा इतका प्रभावी नसल्याने त्या भीतीचा भारतीयांवर फारसा प्रभाव पडला नव्हता. परंतु अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार भारतातील २४ टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३० करोड भारतीयांना पहिल्या टप्प्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. पण, वास्तविक मृत्यूदर हा फक्त ०.०२ टक्केच निघाला होता, असे मत अभ्यासकांनी मांडले आहेत.
दिल्लीतील अँटीबॉडी सर्वेच्या निष्कार्षावरुन प्रथमदर्शी कोरोनाची भीती अवास्तव असल्याचे निदर्शनास येते. त्याचा मृत्यूदरही कमी असल्याने कोरोनाला भयानक आपत्ती न समजता इतर गंभीर आजारासारखा आजार समजून त्यावर उपाययोजना करायला हव्यात. महाराष्ट्रातही अँटीबॉडी सर्वे करुन त्याच्या निष्कर्षावरुन पुढील निर्णय घेण्याची गरज आहे. जेणे करुन नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल.- डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ. वर्धा.