दहेगाव पोलिसांची आरोपीस मारहाण
By admin | Published: May 12, 2014 12:04 AM2014-05-12T00:04:13+5:302014-05-12T00:04:13+5:30
कोपरा येथील पवन उर्फ गोलू अरुण फसाटे (२४) यास दहेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत ठाणेदाराचा रायटर शिपाई रवींद्र याने जबर मारहाण केली.
सेलू : कोपरा येथील पवन उर्फ गोलू अरुण फसाटे (२४) यास दहेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत ठाणेदाराचा रायटर शिपाई रवींद्र याने जबर मारहाण केली. पवन यास रविवारी सेलू येथील न्यायालयात हजर केले असता त्याने न्यायदंडाधिकार्यांकडे मारहाणीबाबत तक्रार केली़ न्यायालयाने दखल घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. सेलू येथे वैद्यकीय तपासणी केली असता त्याचे दोन्ही हात, पाठ व कंबरेखाली जबर मार असल्याचे आढळून आले. कोपरा येथील पवन उर्फ गोलू अरुण फसाटे यास अपराध केला नसताना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दहेगाव पोलिसांनी त्याच्या घरून पोलीस ठाण्यात आणले. त्याने मी कोणता गुन्हा केला, असे पोलिसांना विचारले असता तू ठाण्यात चल मग, सांगतो, असे म्हणत ठाण्यात आणले. तेथे रात्रभर ठेऊन शनिवारी सकाळी शिपाई रवींद्र याने पवनला टेबलवर झोपवून पट्ट्याने बेदम मारहाण केली. यात त्याचे दोन्ही हात, पाठ व कंबरेच्या खाली दुखापत झाली़ शिवाय मारहाणीचे वळ दिसत आहेत़ केवळ मारहाणच केली नाही तर त्याच्यावर दारूचे खोटे गुन्हेही दाखल केले़ त्याच्याकडून पाच लिटर दारू जप्त केल्याचे दाखविण्यात आले. पवनला शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता ठाण्यात आणले; पण अटक शनिवारी दाखवित न्यायालयात रविवारी हजर केले. न्यायाधीशांसमोर त्याने पोलिसांच्या कारवाईचा पाढाच वाचला़ अंगावरील मारहाणीचे वळ व त्याची तक्रार पाहता सेलू येथील सहदीवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी शहजाद परवेज यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीस यंत्रणा हादरली़ दहेगाव पोलीस ठाण्याची गाडी लगेच सेलू ग्रामीण रुग्णालयात धडकली आणि डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला़ सध्या दहेगाव पोलीस ठाण्याचा कारभार विचित्र आहे़ कर्मचार्यांवर ठाणेदारांचा वचक नसल्याचेच यावरून दिसून येते.(तालुका प्रतिनिधी)