देवळी व आर्वीत गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:24 AM2018-02-13T00:24:32+5:302018-02-13T00:24:53+5:30

विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला.

Deoli and Arvite hail | देवळी व आर्वीत गारपीट

देवळी व आर्वीत गारपीट

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा

आॅनलाईन लोकमत
वर्धा : विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला. तर दुपारी देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव) तर आर्वी तालुक्यातील विरूळ, रसुलाबाद, रोहणा येथे गारपीट झाली. गारपीट वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले. तर वर्धा व खरांगणा परिसरात मुसळधार पाऊस आला.
नाचणगाव येथे गारपीटांमुळे शेती पांढरी झाल्याचे दिसून येते आहे. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन आल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. कालपर्यंत पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात असताना आज झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुरता अडवणीत सापडला आहे. आज पहाटेच्या सुमारास आलेला पाऊस आणि गारपीटीमुळे शेतातील उभा गहू झोपला. गारींच्या माऱ्याने चण्याच्या घाट्या फुटल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे अवकाळी पावसाचा या कापूस उत्पादकांनाही फटका बसला.
आपटी परिसरात नागरिकांच्या घरासमोर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या भागात आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या गारपीटीमुळे रस्ते पांढरे झाले होते. तर पुलगावात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.
जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात २० हजार ४९९ हेक्टर वर गहू तर ४०,२३६ हेक्टरवर चणा पिकाची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या सुचना प्राप्त होताच कृषी विभाग झालेल्या नुकसानीची आकडेवारी गोळा करण्यासाठी लागले आहे.
४५८ गावांतील बत्ती झाली होती गुल
या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ फिडरवरील वीज पुरवठ्यात बिघाड आला होता. यामुळे जिल्ह्यातील ४५८ गावांतील बत्ती गुल झाली होती. यात विरूळ, पुलगावसह इतर भागातील बत्तीही गुल झाली होती. या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. तर सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी सध्या २२ गावातील अडचण शोधण्याचे काम वीज वितरणकडून सुरू आहे. ही दुरूस्ती होण्याकरिता आणखी किती काळ लागेल, हे सांगणे कठीण आहे.
माहिती घेण्याकरिता सर्वेक्षण करण्याच्या सूचना
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतांना बराच फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. यात शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याकरिता सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. ही माहिती देण्यात देवळी तालुका पहिला ठरला असून येथे ५०५ हेक्टरमधील गहू तर ६३ हेक्टरमधील चणा पिकांचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
आणखी दोन दिवस धोका
जिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर असलेले साहित्य झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Deoli and Arvite hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.