उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला माजी खासदारांची दांडी; तर्कविर्तक सुरू
By रवींद्र चांदेकर | Published: March 21, 2024 06:12 PM2024-03-21T18:12:56+5:302024-03-21T18:13:21+5:30
भाजप उमेदवारासमोर निर्माण झाला पेच.
रवींद्र चांदेकर,वर्धा : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यानी बुधवारी रात्री नागपूर मार्गावरील एका सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाच्या माजी खासदाराने चक्क दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस बुधवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास येथे आले होते. त्यांनी नागपूर मार्गावरील एका सभागृहात लोकसभा निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एका बुथचे पालकत्व स्वीकारून काम करावे, अशा सूचना दिल्या. ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळण्याचे नियोजन करा, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला विदर्भ संपर्कप्रमुख डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यासह सहाही विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष, अध्यक्ष, जिल्हा चिटणीस, आघाडी व मोर्चा प्रमुख, प्रदेश पदाधिकारी, सहाही विधानसभा निवडणूक प्रमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख यांची उपस्थिती होती. मात्र, माजी खासदार सुरेश वाघमारे बैठकीकडे फिरकलेसुध्दा नाही. जवळपास अडीच तास बंदव्दाराआड ही बैठक सुरू होती. मात्र, भाजपकडून विद्यमान खासदारांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार सुरेश वाघमारे नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्तही केली. त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
बुधवारच्या महत्त्वाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यामुळे अंतर्गत धुसफूस अद्याप शमली नसल्याचे दिसून येत आहे. तथापि, माजी खासदार बाहेरगावी असल्यामुळे वरिष्ठांना कळवून अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. यावरूनही तर्कविर्तक सुरू असून भाजप उमेदवारासमोर पेच निर्माण झाला आहे.