वर्धा : शासनाचा महत्त्वाकांशी स्पर्धात्मक उपक्रम असलेल्या ‘कायाकल्प’ यात वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी शुक्रवारी तज्ज्ञांच्या चमूने केली. यावेळी पाहणी चमूतील तज्ज्ञांनी काही रुग्णांशीही संवाद साधला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवा आणि या रुग्णालयावर असलेला रुग्णांचा विश्वास पाहणी सदर चमूतील अधिकारीही भारावून गेले होते.
डॉ. शाजीया शम्स आणि डॉ. संजय चिलकर यांनी शुक्रवारी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, अस्थीरोग विभाग, प्रसुती विभाग, अतिदक्षता विभाग, ट्रामा केअर युनिट, ब्लॅड बँक आदी विभागांची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना दिल्या जाणा-या आरोग्य सेवेची माहिती जाणून घेतली. येथे असलेल्या विविध यंत्राचा रुग्णांना कसा फायदा होतोय याची अधिकची माहिती थेट रुग्णांशी संवाद साधून जाणून घेतली.
शिवाय चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा सदर रुग्णालयाच्या माध्यमातून दिली जाते काय? या प्रश्नाचे उत्तर रुग्णांकडूनच जाणून घेतले. रुग्णांशी संवाद साधल्यानंतर रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या डॉ. शाजीया शम्स आणि डॉ. संजय चिलकर यांनी रुग्णालयाच्या कामाकाजाविषयी समाधान व्यक्त केले.सुरक्षा रक्षकाशी साधला संवादजिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या डॉ. संजय चिलकर यांनी तेथील सुरक्षा रक्षकांशीही संवाद साधला. अचानक रुग्णांची गर्दी झाल्यास तुम्ही आपले कर्तव्य अशा प्रकारे बजावतात असा प्रश्न यावेळी त्यांनी एका सुरक्षा रक्षकाला केला. त्यावर त्या सुरक्षा रक्षकाने ‘साहेब आम्ही रुग्णांसह रुग्णांच्या कुटुंबीयांना अतिशय प्रेमाणे डॉक्टर साहेब रुग्ण तपासत आहेत. लवकरच तुम्हालाही आत सोडू, तुम्हाला तपासताना कुणी घाई केल्यास तुम्ही तुम्हाला होणारा त्रास व्यवस्थित रित्या डॉक्टरांना सांगू शकणार नाहीत. त्यामुळे योग्य औषधोपचार होणार नाही. त्यामुळे धीर धरा असे अतिशय प्रेमाने सांगतो’ असे सांगितले. त्यावर प्रश्न विचारणाºया डॉ. चिलकर यांनी सुरक्षा रक्षकांच्या कामावर समाधान व्यक्त केले. शिवाय त्याच्या खांद्यावर हात ठेवत कौतुकाची थाप दिली.डॉ. शाजीया शम्स यांनी जाणले महिला डॉक्टरांसह स्त्री रुग्णांचे म्हणणे...रुग्णालयाची पाहणी आणि तेथील सोई-सुविधांचा आढावा जाणून घेताना डॉ. शाजीया शम्स यांनी काही महिला वैद्यकीय अधिकाºयांसह स्त्री रुग्णांशी संवाद साधला. प्रत्येक स्त्री निरोगी असावी यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. शम्स यांनी स्त्री रुग्णांशी साधलेला संवाद या पाहणीत महत्त्वाचा ठरला. त्यांनीही वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दिल्या जात असलेल्या आरोग्य सेवांचे कौतुक केले.आज आम्ही वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करीत आहोत. शिवाय तेथील सोई-सुविधांची माहिती जाणून घेत आहोत. रुग्णांशीही संवाद साधल्या जात आहे. या पाहणीचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर करण्यात येईल.- डॉ. संजय चिलकर, तज्ज्ञ, कायाकल्प पाहणी चमू.