चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाईंमध्ये उद्भवलेल्या लम्पी त्वचारोगाचा झपाट्याने फैलाव सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील काही गावे सोडली तर इतर ठिकाणचे पशुधन अद्यापपर्यंत या संकटापासून सुरक्षित आहे. यामुळे येथील दूध संकलनावरही काहीच परिणाम झालेला नाही. लम्पी रोगाची साथ आल्यानंतरही सेवाग्राम येथील जिल्हा दुग्ध विकास कार्यालयात दररोज सरासरी ९८६ लिटर दूध संकलन होत आहे. त्यामुळे लम्पीचा दूध संकलनावर परिणाम नसून नागरिक बिनधास्त शुद्ध गाईचे दूध पिऊ शकतात. जिल्ह्यात मागील महिनाभरात दुग्धविकास विभागाकडून वर्धा संघाकडून ९८६ तसेच गोरसभंडारकडून ८.०९१ लिटर दूध संकलन केले आहे. तर तीन खासगी डेअरींमार्फत तब्बल ५८ हजार ४८४ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. तसेच २२ हजार ४९१ लिटर दुधाचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गावांमध्ये पशुधनावर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला असला तरी दूध संकलन आणि वितरणावर याचा परिणाम झाला नसल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी शैलेश नवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. लम्पी विषाणूमुळे गायीच्या मृत्यूदर कमी असला तरी त्याचा थेट परिणाम तिच्या दूध उत्पादनावर आणि गर्भाशयावर होतो. तज्ज्ञांच्या मते हा रोग दुधाच्या उत्पादनावर देखील परिणाम करतो. गायीचे दूध ५० टक्क्यांनी कमी होते. हा आजार आर्थिक नुकसान करणारा आहे. मात्र, जिल्ह्यात तशी परिस्थिती नसून दूध उत्पादनावर फार काही परिणाम झाला नसून संकलनही व्यवस्थित सुरु आहे.
संक्रमित जनावरांना पूर्णपणे वेगळे करणे आवश्यक - लम्पी विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत तज्ज्ञांचे असे मत आहे की, संक्रमित प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. संसर्गाचा वेग वेगवान असला तरी गुरांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे.- अशा स्थितीत शेतकरी व गोशाळा कर्मचाऱ्यांनी प्रथम संक्रमित गायीला उर्वरित जनावरांपासून वेगळे करून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरू शकतो.
दूध जास्त काळ उकळणे गरजेचे - गाईच्या दुधात असलेले विषाणूदेखील दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळणे आवश्यक आहे.- पाश्चरायझेशनद्वारे वापरले जाणारे दूध कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. - परंतु, हे दूध जर गाईच्या बछड्याने पिले तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत बछड्याला गाईपासून दूर ठेवावे.
जिल्ह्यातील विविध गावांत ‘लम्पी’चा शिरकाव झाला असला तरी याचा दूध संकलन आणि वितरणावर परिणाम झालेला दिसत नाही. दररोज सरासरी ६७ हजार ५६१ लिटर दुधाचे संकलन केले जात असून २२ हजारांवर दुधाचे वितरण केले जात आहे. सध्यातरी दूध संकलनावर लम्पीचा परिणाम झालेला दिसून येत नाही. - शैलेश नवले, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी. वर्धा.
मी दररोज ८०० ते ९०० लिटर दूध विक्री करतो. ‘लम्पी’मुळे पशुधनाचे लसीकरण झाले आहे. शासकीय संस्थांमध्ये दुधाची विक्री होत असल्याने आम्ही काळजी घेतो. दूध विक्रीत कुठलीही घट आलेली नाही.- गोविंद डोळे, दूध विक्रेता, पिपरी मेघे.
सध्या दूध संकलनात कहीशी घट आली आहे. मात्र, लम्पीचा दूध संकलनावर परिणाम झालेला नाही. आमच्या सहकारी संस्थेतर्फे पशुपालकांना पाच हजारांचे अनुदानही आम्ही दिलेले आहे. दूध संकलनावर लप्मीचा परिणाम नसून दूध अगदी शुद्ध आहे. - उमेश तेलरांधे, अध्यक्ष, गो दुग्ध सह.संस्था, रामनगर.