नदी पात्राचे खोलीकरण गावकर्यांना मिळाला दिलासा
By admin | Published: May 11, 2014 12:35 AM2014-05-11T00:35:28+5:302014-05-11T00:35:28+5:30
शासनाच्या पाठोपाठ शेतकर्यांच्या मदतीसाठी अन्य संस्थांचेही हात सरसावले आहेत़ बजाज फाऊंडेशन नामक संस्थेने नाला सरळीकरणाचे काम हाती घेत ते पूर्ण केले़
झडशी : शासनाच्या पाठोपाठ शेतकर्यांच्या मदतीसाठी अन्य संस्थांचेही हात सरसावले आहेत़ बजाज फाऊंडेशन नामक संस्थेने नाला सरळीकरणाचे काम हाती घेत ते पूर्ण केले़ शेतात पाणी शिरून होणारे संभाव्य नुकसान टळल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे़ कित्येक वर्षांपासून पंचधारा नदी पात्रात उन्हाळ्याची चाहुल लागताच फेब्रुवारी-मार्च महिन्यात एकही थेंब पाणी राहत नव्हते़ यामुळे गावातील गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भिषण झाली होती़ शिवाय गावातील वा नदीकाठच्या शेत परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीदेखील जलदगतीने कमी होत होती़ यामुळे पिकांना पाणीदेखील अपूरे पडत होते़ पावसाळ्यात येणार्या पुरामुळे गावातील नदीकाठच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होत होते़ सर्व समस्या निकाली काढण्यासाठी बजाज फाऊंडेशनद्वारे नदी पात्राच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले़ विवेक हळदे, गजानन उडाण व अन्य सहकार्यांच्या पुढाकाराने लोकप्रतिनिधींचा निधी व लोकवर्गणी गोळा करण्यात आला़ पंचधारा नदीच्या खोलीकरणासह रूंदीकरणाचे काम करण्यात आले़ उर्वरित काम १५ दिवसांनी सुरू होणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली़ यामुळे गावातील अनेक समस्या सुटल्यात़ पावसाळ्यातील पुराचा धोका कमी झाला असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली़ नदी परिसरातील शेतकर्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढल्याने पिकांना ओलित करणे सोईस्कर झाले आहे. या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या कामामुळे गावातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)