डाळी कडाडल्याने सर्वसामान्यांना चिंता
By admin | Published: June 13, 2015 02:09 AM2015-06-13T02:09:24+5:302015-06-13T02:09:24+5:30
महागाईची झळ कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटत असताना त्याचे चटके अधिकच तीव्र होत आहे.
वर्धा : महागाईची झळ कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटत असताना त्याचे चटके अधिकच तीव्र होत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गणाला भिडत असताना सर्वसामान्यांच्या जेवणात महत्त्वाचे असलेले वरणही गायब होण्याची वेळ आली आहे. वर्षभरात तुरीसह इतर डाळीच्या किंमती २० ते २५ रुपये प्रतिकिलोने वाढल्याने ‘दाल रोटी’ दुरापास्त होण्याची वेळ आली आहे.
गत महिन्यात ८० ते ८५ रुपये किलोच्या घरात असलेली तुरीची डाळ आज १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. या पाठोपाठ इतर डाळीही भडकल्याने जेवणाच्या ताटातून डाळीचे पदार्थ नजेरआड होण्याची वेळ आली आहे. डाळीच्या वाढलेल्या किंमतीमुळे खर्चाचे बजेट बसविणे गृहिणींना अडचणीचे जात आहे. या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला त्या तुलनेत मिळणारा दर मात्र कमी आहे.
तूर पिकवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजालाही डाळीच्या वरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. डाळीच्या वाढलेल्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसत बसल्याचे दिसून येत आहे. हॉटेलात सर्वात कमी खर्चाची भाजी म्हणून दालफ्रायकडे पाहिले जात होते. डाळीचे भाव वाढल्याने आज या डिशचे दर वाढले आहे. दर वाढले असून मिळणाऱ्या दालफ्रासमध्ये दाळ कमी व इतर मसालाच जास्त असल्याचे दिसत आहे. याला डाळींचे कडालेले भाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
शरीरात प्रथिनाची मात्रा सांभाळण्याकरिता जेवणात तुरीच्या डाळीच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. या सोबतच इतर डाळींचा अंतर्भाव केला जातो. मात्र गत महिनाभरापासून वाढलेल्या या डाळीच्या दरामुळे नागरिकांच्या ताटातून डाळीचे पदार्थ नजरेआड होण्याची शक्यता बळावली आहे. रोजमजुरी करणाऱ्यांना तर तुरीची डाळ विकत घेणे शक्य नसल्याचे दिसते. राज्यात नवे शासन आल्याने महागाईचा वाढता आलेख कमी होईल असे सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र महागाई कमी होण्यापेक्षा ती वाढतच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे सत्तेत असलेले शासन सर्वसामान्यांच्या नाही तर व्यापारी धार्जिने असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहेत. महागाईच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या या बडग्यापासून नेमकी मुक्ती केव्हा मिळेल याची प्रतीक्षा कायमच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)