जड वाहनांमुळे रस्ता झाला अरुंद
By Admin | Published: March 8, 2017 01:56 AM2017-03-08T01:56:50+5:302017-03-08T01:56:50+5:30
शहरातील सिव्हील लाईन भाग म्हणून ओळख असलेल्या गांधी पुतळा ते विश्रामगृह या मार्गावर ठिकठिकाणी मनमर्जीने जड वाहने पार्क केली जात आहेत.
मोठ्या अपघाताची भीती : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
वर्धा : शहरातील सिव्हील लाईन भाग म्हणून ओळख असलेल्या गांधी पुतळा ते विश्रामगृह या मार्गावर ठिकठिकाणी मनमर्जीने जड वाहने पार्क केली जात आहेत. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असून याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
स्थानिक गांधी चौक परिसरातील प्रशासकीय इमारतीत आरटीओ कार्यालय, जिल्हा भूमी-अभिलेख कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, कामगार न्यायालय आदी विविध कार्यालये आहेत. तसेच याच परिसरात यशवंत महाविद्यालय आहे. परिणामी, प्रशासकीय इमारतीसमोर नेहमीच नागरिकांसह विद्यार्थ्यांची गर्दी असते. परंतु, याच परिसरात सध्या जड वाहने मनमर्जीने उभी केली जात आहे. रस्त्याच्या कडेला वाहनचालकांकडून वाहने उभी केली जात असली तरी इतरांच्या जीवितास धोकादायक ठरेल अशाच पद्धतीने ही वाहने उभी असतात. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. प्रशासकीय इमारतीतील आरटीओ कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे वाहनचालक आपली छोटी, मोठी व जड वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी, येथे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तसेच रस्त्यावर मनमर्जीने उभी केली जात असलेल्या जड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना विश्रामगृह ते गांधी पुतळा या मार्गाने जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. इतरांच्या जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी केल्यास वाहतूक पोलिसांकरवी वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, येथील सध्याची परिस्थिती पाहूनही वाहतूक पोलीस कुठलीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)