अवकाळी पावसाची शेतकऱ्यांत धास्ती
By Admin | Published: March 9, 2017 12:52 AM2017-03-09T00:52:17+5:302017-03-09T00:52:17+5:30
रबी हंगामातील गहू, चना पिकाची काढणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी चन्याच्या गंज्या लावून ठेवल्या आहे.
तुरी, चण्याच्या गंजीवर ताडपत्री : शेतमालाच्या विक्रीपूर्वीच निसर्गाच्या अवकृपेची शक्यता
वर्धा : रबी हंगामातील गहू, चना पिकाची काढणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी चन्याच्या गंज्या लावून ठेवल्या आहे. तुरीची काढणी झाली असून शेतात तुरीच्या पेट्या लावल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप शेतमाल विकला नाही. यातच मंगळवारपासून सर्वत्र ढगाळी वातावरण आहे. जिल्ह्यात काही ठिकणी तुरळक पाऊसही झाला. यामुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे. निसर्गाच्या तावडीत सापडून शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून बुधवारी ताडपत्र्यांचा आधार शेतकरी घेत असल्याचे पाहावयास मिळाले.
जिल्ह्यात गारपिट झाले नसले तरी मंगळवारी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. समुद्रपूर तालुक्यात नारायणपूर येथे २० मिनीट तर हिंगणघाट, आर्वी तालुक्यात १० मिनीट पावसाच्या सरी कोसळल्या. शिवाय तळेगाव (श्या.पं.), मोझरी (शेकापूर), सेवाग्राम परिसरात तुरळक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गहू आणि चना पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. शिवाय तुरी नाफेडला विकण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पेट्या लावून ठेवल्या आहेत. बाजार समितीत गर्दी असल्याने शेतकरी प्रतीक्षा करीत होते; पण मंगळवारी आलेल्या पावसामुळे तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले. गव्हाच्या काढणीसाठी पावसामुळे शेतकऱ्यांना आणखी एक-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात कुठेही गारपिट झाल्याचे वृत्त नसले तरी ढगाळी वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहे. सेलू व आष्टी तालुक्यात पावसाची नोंद नाही; पण शेतकऱ्यांनी दक्षता म्हणून शेतातील चना, तुरीच्या ढिगांना ताडपत्रीचे संरक्षण दिल्याचे दिसून येते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
तूर खरेदी केंद्रांवरही तारांबळ
मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी काही भागात अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. परिणामी, बाजार समित्यांमधील तूर खरेदी केंद्रांवरही शेतकऱ्यांची शेतमाल झाकताना तारांबळ उडाली. शिवाय खरेदी करून ठेवलेला मालही झाकण्यासाठीही खरेदीदारांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी तुरीचे पोते ओले झाल्याचे सांगण्यात आले. यातही शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले.
अवकाळी पावसाचे सावट
सेवाग्राम : मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापूस, चना, गहू व तुरी ओल्या झाल्या. सकाळी ढगाळी वातावरण व पुन्हा उन्ह तापल्याने शेतकरी निश्चिंत होता. मजूर नसल्याने कापूस वेचणी शिल्लक होती. चन्याची सवंगणी सुरू असून काहींनी गंजी लावून ठेवली तर काहींची कापणी सुरू होती. चना व तुरीच्या गंजी शेतात लावून होत्या. चन्याच्या गंजीला ताडपत्र्यांचे संरक्षण दिले; पण मध्यरात्री आलेल्या पावसाने कापूस, तुरी, चना ओला झाल्याने नुकसान झाले.
देवळीतही पाऊस
मंगळवारी रात्रीच्या सुमारास देवळी-पुलगाव तालुक्यातही सुमारे १० मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे काढून ठेवलेला शेतमाल झाकताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे.
शेतमाल भिजल्याने नुकसान
केळझर परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची सवंगून ठेवलेल्या चन्याचे ढिग शेतात रचून होते. अचानक पाऊस आल्याने शेतमाल वाचविण्याकरिता ताडपत्री झाकताना शेतकऱ्यांनी एकच ताराबंळ उडाली. या पावसामुळे गहू, चना, कापूस या पिकांसह फळ, भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.