आंदोलनाचा तिसरा दिवस : केले होते जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पणवर्धा : राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील शासकीय गोदामातील हमालांनी सोमवार ७ रोजीपासून पाठबंद-कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूजा करून जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण केले होते. बुधवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मागण्यांची पुर्तता न झाल्याने हे आंदोलन सुरूच होते.मागण्यांच्या पूर्ततेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय गोदामातील हमालांनीचे धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू आहे. शासकीय गोदामातील कामगारांच्या मुळ वेतनातून एकूण ४० टक्के रक्कमेची कपात करण्यात येत आहे. तसेच त्यांना वेळीच वेतन मिळत दिल्या जात नसल्याने हमालांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. यामुळे होत असलेली कपात बंद करावी व ती रक्कम शासनाने भरावी, महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. सदर मागणीचे निवेदन सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असले तरी मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्याने बुधवारीही आंदोलन सुरूच होते.महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी अधिनियम १९६९ व त्यानुसार शासनाने विधियुक्त केलेल्या योजनेची वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामात अंमलबजावणी सुरू आहे. याच अधिनियमाप्रमाणे कामगारांना मूळ मजुरी व त्यावर ३० टक्के रकमेची कपात केली जाते. तसेच दरमहा वेतन मिळत नाही. विशेष म्हणजे मुख्य नियोक्ता म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी माथाडी मंडळात नोंदीत आहे. यासंबंधी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभागाने २००३ ते २०१६ या कालावधीत वेळोवेळी आदेश व सूचना केलेल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतन व लेव्हीसंबंधी आदेश दिले आहे. तरीही कामगारांच्या वेतनातून कपात सुरू असल्याचा आरोप करीत कामगारांच्या मूळ वेतनातील कपात बंद करावी, कामगारांचे दरमहा वेतन १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)
मागण्यांची पूर्तता न झाल्याने पाठबंद-कामबंद आंदोलन सुरूच
By admin | Published: November 10, 2016 12:58 AM