सयाजी महाराज : समर्थ लहानुजी महाराज जयंती महोत्सव टाकरखेड : चारित्र्य जोपासून देश उभा करण्याचे शिक्षण संतांच्या दरबारातच मिळते. जीवनातील नम्रता, आचरणातील शुद्धता, चित्तातील दृढता, बुद्धीतील व्यापकता, पर्यायाने देशात समभावाने वागण्याची शिकवणूक संताच्या सहवासातून मिळते. शाळेतील शिक्षणाचा भर चारित्र्यापेक्षा चातुर्यावर अधिक आहे, असे प्रतिपादन सयाजी महाराज यांनी केले. ते समर्थ लहानुजी महाराज यांच्या जयंती महोत्सवात मार्गदर्शन करताना बोलत होते. सयाजी महाराज पुढे म्हणाले, संत संगतीतून जीवन कसे जगावे तसेच सेवेची महती कळते. चित्त स्थिर होते. त्यातून सुख-दु:खाकडे समान भावनेने पाहण्याचे सामर्थ्य येते. लहानुजी महाराज शेतात काम करायचे. दर्शनाला आलेल्या भाविकांना ते शेतात काम करायला लावायचे. काळ्या आईशी संबंध तोडू नका, तीच तुम्हाला जगवेल, असा यातून ते भाविकांना उपदेश देत होते. समर्थ आडकूजी महाराजांनी घडविला हा शिष्यसंप्रदाय अनिष्ठाला दूर करण्याचे सामर्थ्य राखतो. आध्यात्मिक प्रचिती ही जीवन मूल्य सांभाळण्यासह देशसेवेला हातभार लावण्याच्या कामाला बळ देते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी संत पुजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान संस्थानाच्यावतीने अंबादास महाराज, सयाजी महाराज, अत्रे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. गोपालकाल्याचे कीर्तन प्रकाश महाराज वाघ यांनी केले. यावेळी स्मरणीकेचे लोकार्पण करण्यात आले. समर्थ लहानुजी महाराजांच्या पालखीचे पुजन डॉ. अरूण पावडे, उपकार्यकारी संचालक महल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी-मिरवणुकीने गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. यात विविध भजनमंडळाचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अहवालाचे वाचन बाळासाहेब पावडे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
शाळेतील शिक्षणाचा भर चारित्र्यापेक्षा चातुर्यावर
By admin | Published: March 08, 2017 1:57 AM