लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : धुळ्यातील नरहरी भावे यांच्या समाधीचे दर्शन आणि प्रार्थना करून २७ ऑक्टोबर रोजी निघालेली सर्वोदय संवाद सायकल यात्रा गुरूवारला नयी तालिम समिती परिसरात पोहचली. कार्यालय मंत्री डॉ शिवचरण ठाकुर यांनी सूतमाळ आणि कुंकुमतिलक करून सर्वात करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भात अनेकांना आर्थिक हाल अपेष्टांचा सामना करावा लागला. सुरक्षित अंतरामुळे आणि घरातच राहण्याचा प्रसंग निर्माण झाल्याने माणूस माणसापासून दुरावला.तर दुसरीकडे कोरोनाची भिती कायम. अशातच सात महिन्यांच्या कालावधीनंतर महात्मा गांधीजींच्या १५१,आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ तर स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे होणार असल्याने कष्टकरी, शेतकरी, सेवाभावी संस्था, रचनात्मक कार्य करणारी, सेंद्रिय शेती, नयी तालिम शिक्षण प्रणाली, खादी काम आणि संघटनांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आल्याची माहिती यातल्या संयोजक विनोद पगार यांनी सांगितले.
कोरोनामुळे मनात भिती होती लोकांची कशी वागणूक मिळेल एक ना अनेक प्रश्न मनात असतानाही लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन यात्रा काढली. यात अपेक्षापेक्षाही चांगला अनुभव आला. लोकांनी स्वागत करून राहण्या जेवणाचीही व्यवस्था केली. यात्रेदरम्यान गीत, प्रार्थना आणि लोकांशी गप्पा केल्या. यात कोरोना काळातील परिस्थितीचा अनुभव घेता आला. जवळपास १७ ठिकाणी मुक्काम करून १८ दिवसांत ८५० कि.मी.चा प्रवास करीत सेवाग्राम येथे यात्रेचा समारोप करण्यात आला अशी माहिती पगार यांनी दिली.
यात्रेत विकास उफाडे, आकाश कोळी, रोहित देवरे, मयुर पाटील, अभिशेख हिरे, सृजन वाटले, प्रशांत बावस्कर,प्रशांत भेंडे, मंगेश पाटील सहभागी आहेत. सर्व शिक्षण घेत असून शेतकऱ्यांच्या मुले आहेत. यात पगारे हे सर्वोदयाशी बालपणापासून जुळलेले असून गोधडीचा व्यवसाय करतात.
महात्मा गांधी आश्रमला भेट देऊन तीन दिवसांच्या मुक्कामात वर्धा येथील गांधी संस्था, सेवाभावी संस्था आणि विविध संघटनांशी भेट देऊन संवाद साधणार आहेत. स्वागत प्रसंगी विनय करूले, रूपेश कडू, राजू चौधरी, किशोर भोयर, शीतल यदू, ममता चौधरी, किरण कोरचे, भाग्यश्री धुर्वे, खुशबू बायस, कशीश चौधरी उपस्थित होते.