दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलहात कमालीची वाढ

By admin | Published: November 10, 2016 01:01 AM2016-11-10T01:01:29+5:302016-11-10T01:01:29+5:30

वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा म्हणून शासनदरबारी नोंद आहे. असे असताना एका दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात

Extraordinary increase in family cloth due to alcohol addiction | दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलहात कमालीची वाढ

दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलहात कमालीची वाढ

Next

महिला समुपदेशन केंद्राची कामगिरी : चार वर्षांत ७३५ प्रकरणांची नोंद
अरूण फाळके कारंजा (घाडगे)
वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा म्हणून शासनदरबारी नोंद आहे. असे असताना एका दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात कलह निर्माण झाल्याची तब्बल ३०७ प्रकरणे महिला समुपदेशन केंद्रात नोंदविली गेली आहे. यामुळे दारूबंदी जिल्ह्यात दारूबंदीचे हे विदारक वास्तव पुढे आल्याशिवाय राहात नाही.
कारंजा तालुक्यात २६ आॅक्टोबर २०१२ रोजी पोलीस ठाण्याच्या आवारात महिला समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्राला २६ आॅक्टोबर २०१६ रोजी चार वर्षे पूर्ण झाली आहे. या चार वर्षांच्या काळात ७३५ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. या प्रकरणाचा विचार केल्यास पतीच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाला होत असलेला त्रासच अधिक असल्याचे दिसून आले आहे. १६७ प्रकरणे पती किंवा पत्नीच्या स्वभावदोषांचे आणि १६४ प्रकरणे पती-पत्नीच्या संसारात इतरांचा हस्तक्षेप या स्वरूपाची आहेत. दुसरे लग्न या प्रकारात १४, विवाहबाह्य संबंधांची ५३, प्रेम संबंधाबाबत १२, मानसिक रुग्ण दोन, कुमारी माता एक तर अन्य १५ प्रकरणे आहेत.
या केंद्राच्या समुपदेशिका कविता काळसर्पे व उज्ज्वला वैद्य यांनी ठाणेदार विनोद चौधरी आणि चेतना विकास केंद्र गोपूरीच्या संस्थापिका सुमन बंग यांच्या मार्गदर्शनाखाली या चार वर्षांत ३८० प्रकरणांत पती-पत्नीमध्ये समेट घडवून पुन्हा संसार थाटून देण्यात आला आहे.
११४ प्रकरणांमध्ये न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १६ प्रकरणांमध्ये आपसी सोडचिट्ठी करून दिली. २६ महिलांची प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत. १३७ प्रकरणांमध्ये वारंवार पत्र व्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. चार मानसिक रुग्णांची प्रकरणे सेवाग्राम रुग्णालयातील मानसोपचार केंद्राला पाठविली आहेत तर भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत येणारी १७ प्रकरणे पोलीस ठाण्यात परत पाठविण्यात आली आहेत.
लहान मुलीचे एक प्रकरण बालसुधार गृह व एक बालकल्याण समितीकडे पाठविले आहे. घटस्फोटाचे तोटे व वैवाहिक जीवनाचे फायदे समजावून सांगत सहा प्रकरणांतील महिलांना प्रकरणे परत घ्यायला लावली आहेत. २६ प्रकरणांमध्ये समजोत्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अतिरेकी हस्तक्षेप कौटुंबिक कलहाचे एक कारण
दारूचे व्यसन, सासू-सासरे व इतरांचा अतिरेकी हस्तक्षेप तसेच विवाहबाह्य संबंध टाळल्यास अनेक कुटूंबांत शांतता नांदून वैवाहिक जीवन स्वर्गसमान होऊ शकते. स्त्री वा पुरुषामधील संशयी स्वभाव व इतर स्वभावदोषही कौटुंबिक कलहासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. लग्नानंतरही आधीचे प्रेम संबंध कायम राखण्याचा प्रयत्नसुद्धा विवाहोत्तर संबंधाला तडा देण्याचे एक प्रमुख कारण आहे. जीवनात पारदर्शकता ठेवून एकमेकांचा विश्वास संपादन करणे आणि आपूलकी कायम राखणे तथा एकमेकांच्या कार्यात मदत केल्यास संबंध सुमधूर राहून कौंटुबिक जीवन आनंददायी होत असल्याचे या केंद्राच्यावतीने सांगण्यात आले.

१५ प्रकरणांत कायमस्वरूपी खावटी
कारंजा महिला समुपदेशन केंद्रामार्फत या चार वर्षांत १५ प्रकरणांमध्ये कायमस्वरूपी खावटी आणि २० लाखांचे आंदण भांडे मिळवून देण्यात आले आहे. महिलांच्या समस्या, कारणे आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यासाठी १० महिला मेळावे, किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षणावर मार्गदर्शन करण्यासाठी पाच कार्यशाळा, मेळावे तसेच विवाहपूर्व कसे राहायचे, यावर दोन कार्यशाळा आणि गाव पातळीवर महिलांच्या अनेक बैठकी घेण्यात आल्या आहेत.

Web Title: Extraordinary increase in family cloth due to alcohol addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.