आठव्या दिवशीही शेतकरी संप सुरूच
By admin | Published: June 10, 2017 01:17 AM2017-06-10T01:17:45+5:302017-06-10T01:17:45+5:30
कर्जमाफीसह शेतमालाला दर देण्याच्या मागणीकरिता शेतकऱ्यांनी पुकारलेला संपाची वर्धेत आठव्या दिवशीही
हिंगणीत बंद : प्रतिकात्मक अंत्ययात्रेने नोंदविला निषेध; आष्टीत ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कर्जमाफीसह शेतमालाला दर देण्याच्या मागणीकरिता शेतकऱ्यांनी पुकारलेला संपाची वर्धेत आठव्या दिवशीही धग कायम असल्याचे शुक्रवारी दिसून आले. या संपादरम्यान हिंगणी येथे आज बंद पाळण्यात आला तर आष्टी (शहीद) येथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी रस्त्यावर कांदे आणि भुईमुंगाच्या शेंगा फेकून संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
व्यापाऱ्यांनी पाळला बंद
बोरधरण : शेतकऱ्यांनी कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळावा म्हणून हिंगणी येथे शेतकरी आंदोलन समिती व किसान अधिकार अभियानच्यावतीने शुक्रवारी बसस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून एका प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तो पुतळा पोलिसांनी जप्त केला.
हिंगणी येथे शेतकरी आंदोलन समिती व किसान अधिकार अभियान यांच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला गावात उत्तम प्रतिसाद मिळाला. शेतकरी व गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. हिंगणी-सेलू रस्त्यावर टायर पेटवून काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. आठवडी बाजार बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. किराणा व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य करत बंद पाळला. हिंगणी येथील बँक आॅफ इंडिया व कॅनेरा बँक काही काळाकरिता बंद ठेवण्यात आली होती.
हिंगणी बस स्थानकावरून शेतकऱ्यांनी वाजतगाजत शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा गावात फिरविली. बाजार चौकात पोलिसांनी हा पुतळा जप्त केला. यानंतर शेतकऱ्यांनी पूर्ण गावात फिरून बसस्थानक येथे येत सरकार विरोधी घोषणा देत निषेध नोंदविला.
आंदोलनात अजय डेकाटे, भैया दरणे, हबीब शेख, विजय डेकाटे, अमोल मुडे, जतिन रणनवरे, नितिन निघडे, प्रशांत मुडे, सागर डेकाटे, गणेश रत्नवार, गोविंदा पेटकर, ढोले, संजय डेकाटे, दीपक शंभरकर, एकनाथ बरबडीकर, प्रल्हाद बुधे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.