वायगाव (नि़) : जगाचा पोशिंदा अशी ओळख असलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना कंटाळलेल्या शेतकऱ्याला आता शेतमाल कुठे विकावा, हा पेच पडला आहे़ बाजार समितीमध्ये व्यापारी लूट करतात आणि नाफेडची शासकीय खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे़ याकडे लक्ष देत नाफेडची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ मागील वर्षी सोयाबीन काताना अवकाळी पावसाने हजेरी लावली़ यामुळे बहुतांश सोयाबीन खराब झाले़ डागी सोयाबीन शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावे लागले़ पाऊस समाधानकारक झाल्याने रबी हंगामात तोटा भरून काढता येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले; पण निसर्गाने दगा दिला. तोंडी आलेला घास हिसकावून घेतला. काही शेतकऱ्यांना हरभऱ्याची लागवड करताना चना विकून बियाणे, खतांची खरेदी करता येईल, असे वाटले होते; पण या आशेवरही पाणी फेरले़ चना व तूर खरेदीमध्ये बाजार समितीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली़ यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली़ यावरून नाफेडद्वारे चना, तुरीची खरेदी करण्यात आली; पण ही खरेदीही २४ मे पासून बंद करण्यात आली़ शासकीय खेरदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल हमीभावापेक्षाही कमी दराने व्यापाऱ्याला विकावा लागत आहे़ यातही व्यापाऱ्यांनी ‘जमा खोरी कायदा १९५५’ चा धसका घेतल्याचे दिसते़ या कायद्यानुसार व्यापाऱ्यावर कारवाई होऊन दंड आकारला जातो व माल सिल केला जातो़ या कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही मंडीतून शेतमाल खरेदी बंद केली़ आता व्यापाऱ्यांची खरेदीही बंद आणि नाफेडही माल खरेदी करीत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत़ आता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कुठे विकायचा, हा प्रश्नच आहे़ बाजार समिती व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजचे झाले आहे़(वार्ताहर)
नाफेडच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसमोर पेच
By admin | Published: June 23, 2014 12:14 AM