एफसीआयच्या तूर खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक
By admin | Published: March 1, 2017 12:59 AM2017-03-01T00:59:45+5:302017-03-01T00:59:45+5:30
तुरीला व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याने शासनाच्यावतीने केंद्र सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचा आरोप
वर्धा : तुरीला व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याने शासनाच्यावतीने केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांची पिळवणूकच होत असल्याचे दिसून आले आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत निकषाच्या नावावर शेतकऱ्यांची तूर नाकरल्या जात आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे विदर्भ सचिव किशोर किनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.
शाासनाने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग गठित केला. परतु त्याच्या शिफारसी लागू केल्या नसल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. वर्धा बाजार समितीत भारतीय खाद्य निगम कर्मचाऱ्यांकडून तूर खरेदीत देखील शेतकऱ्यांना निकषाच्या कैचीत पकडून व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे. सोमवारी किनकर यांनी स्वत: सकाळी ९ पासून सायंकाळी ९.३० वाजेपर्यंत याचा प्रत्यक्षात अनुभव घेतल्याचे नमूद केले आहे. यात ग्रेडर सुनील सिंग यांनी शेतकऱ्यांचा तुरी निकषात बसत नसल्याचे म्हणत त्या परत करण्याचा सपाटा सुरू केला होता. आणि याच वेळी सर्व नियब धाब्यावर बसवून एका व्यापाऱ्याची दर्जाहिन तूर खरेदी केली. या प्रकाराची माहिती किनकर यांनी उपनिबंधक कडू व तहसीलदार चव्हाण यांना दिली. यानंतर सिंग यांच्याशी बोलने झाले तरीही नंतरच्या खरेदीमध्ये सिंग तसेच एफ.सी.आय.अधिकारी यांनी आपले मुजोरी सुरूच ठेवली.
शासनाने जाहीर केलेल्या हमी भावात व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी करावी व ती न केल्यास व्यापाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व्यापारी, अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेने केली. अन्यथा शेतकरी कामगार संघर्ष परिषदेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.(प्रतिनिधी)