शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:40 PM2017-12-27T23:40:45+5:302017-12-27T23:40:55+5:30
हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत सालोड व सेलसुरा येथे तुर व हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
तूर पीक सध्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे;पण शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव पिकावर दिसून येत आहे. तूर उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्यावतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. रूपेश झाडोदे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आर. व्ही. चनशेट्टी, किडनियंत्रक विनोद जाधव, नाजुका इरपाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तूर व हरभरा पिकावर हेलिकोव्हर्पा आणि शेंगमाशी या मुख्य किडांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्याकडून शेतकºयांचे मोठे नुकसान केले जाते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी. हरभरा पिकामध्ये हेक्टरी ५० प्रमाणात इंग्रजी टी आकाराचे पक्षी स्थानके उभारावी. शिवाय शेतातील प्रथम व द्वितीय अवस्थेतीत अळ्यांसाठी प्रती हेक्टरी एच. ए. एन. पी. व्ही. ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा. किडींनी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास रासायनिक किटकनाशकांचा शेतकऱ्यांना वापर करावा. तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी व हरभºयावरील घाटेअळी नियंत्रणासाठी क्लोरॅट्रेनिलिपोल १८.५ एस. सी. २.५ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस. जी ३ ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुरीवरील शेंगमाशीसाठी मोनोक्रॉटोफॉस ३६ एस. एल. ११ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ई. सी. २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे यावेळी सांगण्यात आले. यंदा कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने भविष्यातील उद्रेक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे कटाक्षाने टाळावे. पीक डिसेंबर, जानेवारी अखेर काढून टाकावे. पराट्या व न उघडलेले बोंड आदीचे शेताबाहेर कंपोस्ट तयार करावे आणि शेत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जी. आर. कापसे यांनी केले.
बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सांगितले उपाय
सदर उपक्रमादरम्यान तज्ज्ञांनी तूर व हरबरा उत्पादक शेतकºयांना विविध विषयाची माहिती दिली. यावेळी जी. आर. कापसे यांनी भविष्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा कपाशी उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागू नये याविषयी उदाहरणे देत सोप्या शब्दात माहिती दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.