वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रावर; पावसाने फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:17 AM2020-06-22T11:17:52+5:302020-06-22T11:18:16+5:30
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मृग नक्षत्रात आलेल्या पेरणी योग्य पावसामुळे बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या. पण मृग नक्षत्राचे शेवटचे दिवस व आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीचे दिवसात वरूणराजा रुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुळे शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून आहे.
सेलू तालुक्यातील बागायती शेतीत प्रथमच सोयाबीन च पेरा वाढला आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत कपाशी चा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे या वर्षीच्या खरीप हंगामात तुरीचा पेराही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
मृग सरी कोसळल्या आणि शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली. अवघ्या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली खरी. पाऊस येईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. गत सहा दिवसापासून पाऊस पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली काहींनी तुषार सिंचनाचा वापर सुरू केला असला तरी वीज भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे
पाऊस दोन ते तीन दिवस आला नाही तर कपाशीची दोबन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची मात्र गरज आहे.
भारनियमनाच्या वेळेत बदल गरजेचा
रात्र पाळीत असणारा थ्री फेज विद्युत पुरवठा हा सकाळी ८ पर्यंत राहत असून ही वेळ १० वाजेपर्यंत करणे व दिवसा दिला जाणारा विद्युत पुरवठा हा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत केल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. वावर आहे तर पॉवर आहे म्हणायचं असेल तर वीज वितरण कंपनीने ह्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी ओलित करू शकतील.