पशुगणनेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:01 AM2019-03-17T00:01:40+5:302019-03-17T00:02:14+5:30
प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
पशुगणना पूर्ण करण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु, विविध कारणांमुळे पशुगणनेचे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने पशुगणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील पशुंची गणना करण्यासाठी ११४ टॅब, पॉवर बँक व सिम उपलब्ध करून देण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर टॅबमध्ये असलेले पूर्वीचे २.० अॅप वर्जन प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्रासदायक असल्याने ३.० हे वर्जन टाकून पशुच्या गणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९ हजार ८४६ ठिकाणी भेटी देऊन टॅबद्वारे पशुची नोंद घेण्यात आली आहे. तर राज्यात प्रथम क्रमांवर गोंदिया, द्वितीय स्थानी अकोला, तृतीय स्थानी हिंगोली तर चतुर्थ स्थानी बुलढाणा जिल्हा असल्याचे सांगण्यात आले. सदर पशुगणना पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.
मुंबई शेवटच्या स्थानी
२० व्या पशुगणनेचे गोंदिया जिल्ह्याने ८७.८१ टक्के काम पूर्ण केले आहे. शिवाय हा जिल्हा सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर वर्धा जिल्ह्यात पशुच्या गणनेचे काम ग्रामीण भागात ७१.४२ तर शहरी भागात ४३.३७ टक्के झाले आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण ६२.६१ टक्के काम झाल्याने वर्धा जिल्हा हा सध्या पशुगणनेच्या कामात राज्यात पाचव्या स्थानी आहे. तर २.३० टक्केच काम झाल्याने मुंबई शेवटून पहिल्या स्थानी असल्याचे सांगण्यात आले.