वर्धा लाेकसभा मतदारसंघातून
वर्धा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यानंतरच्या काळात भाजपाने प्रथम चंचू प्रवेश करून २०१४ पासून आपले बस्तान पक्के केले आहे.
पहिल्या १९५२ ते १९८९ च्या नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग विजय मिळविला होता. १९९१ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसची ही मक्तेदारी मोडीत काढली. १९९६ मध्ये भाजपने येथे चंचू प्रवेश केला. नंतर आलटून पालटून काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला. १९९८, १९९९ मध्ये काँग्रेसने बाजी मारली खरी पण, २००४ मध्ये पुन्हा भाजपने मुसंडी मारली. २००९ मध्ये काँग्रेसने विजय मिळविला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने आपले बस्तान पक्के केले.
१९९१ च्या निवडणुकीपासूनच काँग्रेस खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष, पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी, एकमेकांची जिरविण्याची प्रवृत्ती, नेतृत्वाचा ओसरलेला प्रभाव आदी कारणांमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसवर अवकळा आली. कधी काळी काँग्रेसच्या चिन्हावर कुणीही उमेदवार असला तरी विजयी होत होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये निश्चिततेचे वातावरण होते. नेते निर्धास्त झाले होते. त्याचा फटका पक्षाला बसला अन् भाजपने आपले बस्तान पक्के केले. एवढा बदल होऊनही काँग्रेस नेते अद्याप ताळ्यावर आलेले दिसत नाही. उमेदवारीच्या भांडणात मतदारसंघ मित्र पक्षाला गेला तरी काँग्रेस नेते आपल्याच धुंदीत दिसत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार मैदानात राहणार नाही.दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की
आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार राहत होता. कधी हार, कधी जीत होत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या माजी आमदारावर मित्र पक्षाच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की ओढवली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. परिणामी काँग्रेस तूर्तास वर्धेच्या रिंगणातून बाद झाली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसवर ही नामुष्की ओढावल्याने महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या जिल्ह्यात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे.