वर्धा: लोकसभेसाठी महायुतीने रामदास तडस, तर महाविकास आघाडीने अमर काळे यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. दोन्ही उमेदवार मातब्बर असल्याने यावेळी तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांचा एक लाख ८७ हजार १९१ मतांनी पराभव केला होता. तत्पूर्वी २०१४ च्या निवडणुकीत तडस यांनी काँग्रेसचे सागर मेघे यांचा दोन लाख १५ हजार ७८३ मतांनी पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा ९५ हजार ९१८ मतांनी पराभव केला होता. २०१४ पेक्षा २०१९ च्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचा फरक कमी झाला होता. त्यामुळे यावेळी हा फरक आणखी कमी होऊन भाजप व राष्ट्रवादीत तुल्यबळ लढत होण्याचे संकेत मिळत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ चार दिवस उरले आहे. ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. त्या दिवशी रिंगणात नेमके किती अन् कोणत्या पक्षाचे उमेदवार उरतात, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. ९ एप्रिलपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. मात्र, खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच होणार आहे. तथापि, रिंगणातील वंचित, बसपा आणि इतर उमेदवार किती मते खेचतात, यावर जय आणि पराजयाचा दोलक अवलंबून राहणार आहे.
२०१४ पासून विरोधकांना विजयाची प्रतीक्षा२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. परिणामी २०१४ पासून विरोधकांना विजयाची प्रतीक्षा आहे. विरोधकांचा १० वर्षांच्या विजयाचा दुष्काळ यंदा संपणार का, असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर मतदार राजाच्या हाती आहे. २६ एप्रिलला मतदान झाल्यानंतर तब्बल सव्वा महिन्यानंतरच मतदारांचा कौल बाहेर येणार आहे.