चौथ्या दिवशीही चालला गजराज
By admin | Published: June 9, 2017 02:09 AM2017-06-09T02:09:24+5:302017-06-09T02:09:24+5:30
पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेत चौथ्या दिवशीही अतिक्रमणावर गजराज चालला.
नगर पालिकेची कारवाई : कारवाईदरम्यान वाहतूक प्रभावित
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेत चौथ्या दिवशीही अतिक्रमणावर गजराज चालला. येथील शिवाजी चौक व मुख्य रहदारीच्या मार्गावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी व्यावसायिक व नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती.
शिवाजी चौक येथील मोहन परमानंद कटियारी यांचे पक्के बांधकाम असलेल्या कापड दुकानाचा समोरचा भाग पाडण्यात आला. तसेच संतोष बुक डेपो बाजूच्या अनामिका उद्यानासमोरील रोटरी क्लब कम्पाउंड, गणपती मंदिर शेजारील हातठेला जमीनदोस्त करण्यात आला. डागा यांच्या दुकानासमोरील नाली, पावडे हॉस्पीटलचे समोरचे शेड, विश्रामगृह समोरील वनविभागाच्या भिंतीलगत लागून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले होते. ते देखील कारवाईत पाडण्यात आले. चार दिवसापासून अतिक्रमण हटविणे सुरू असल्याने मोठ्या शहरातील अंतर्गत वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याशिवाय न्यायालयासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या पानटपरी, फास्टफुटच्या बंडी, रसवंती हटविण्यात आल्या आहे. सिव्हील लाईन परिसरातील जि.प. कन्या शाळेच्या भिंती लगतची दुकाने पालिका प्रशासनाने नोटीस दिल्यानंतर विकेत्यांनी काढली आहे.
गत दोन-तीन वर्षापासून या भागात मोठ्या प्रमाणावार अतिक्रमण झाल्याने येथे वर्दळ असायची. त्यामुळे वाहनांच्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. येथील अतिक्रमण काढल्याने हा परिसर आता मोकळा श्वास घेत आहे.
रस्त्याचे होणार रूंदीकरण
आर्वीतील अतिक्रमण रस्ता रूंदीकरणाकरिता हटविण्यात येत आहे. सदर रस्ता दोन पदरी होणार आहे. मात्र मार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढल्याने रस्ता बांधकामाला अडचण निर्माण होत आहे. या मोहिमेत काही दुकानदारांचा व्यवसाय हिरावल्याने त्यांच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर व्यावसायिकांना पालिकेने पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे.