वर्धा - शौर्याच्या जोरावर जगात आपल्या सैन्याने ओळख निर्माण केली आहे. आपले सैनिक देशाच्या अखंडतेतासाठी कायम शीर हातावर घेऊन लढत असतात. आतंकवाद, नक्षलवाद , पूर, नैसर्गिक आपत्ती अशा सर्व परिस्थितीत देशातील जनतेचे रक्षण करतात. अशा सैनिकांचे शौर्य भावी पिढीला प्रेरणा देते असे प्रतीपादन उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने विकास भवन येथे वर्धा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, माजी सैनिक आघाडीचे राम कोरके, राजेश बकाने उपस्थित होते.
यावेळी शहीद सैनिकांच्या वीर माता, वीर पत्नी यांचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये शिताबाई लाखे, नलीनी टिपले, शातांबाई वरहारे, सविता समरित, जयश्री चौधरी, मंदा कोल्हो, हर्षदा मेढे, शकंर गोडे, नंदकिशोर खडसे, केशव घोडखांदे, माधव मोहिते, श्याम पडसोदकर,राजेश सावरकर, बिपीन मोघे, विवेक ठाकरे, पुडंलिक बकाने, कर्नल चितरंजन चावडे, अरुणा सावरकर, रत्नमाला मेघे, शारदा कश्यप , भारती ठाकरे, अभिमन्यु पवार, पारणु भगत, यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शहीद सैनिकांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांना नमन केले.जगातील सर्व देश आपल्या देशाला मान देतात त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपल्या सैन्याचा मजबूत कणा आहे. सैनिकांच्या अनुभवाचा आपल्या समाजाने गावाच्या, देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या शौर्य गाथांचे प्रेरणादायी चित्रफिती तयार करून भावी पिढीला योग्य दिशा व प्रेरणा देण्यासाठी दाखवाव्यात. निवृत्त झालेल्या सैनिकांना आणि त्याच्या परिवाराला चांगले जीवन जगता यावे यासाठी सर्व सैनिकांना एकाच ठिकाणी शेत जमीन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शंभर एकर जागा निवडून पाच एकर जमीन सैनिकांना उपलब्ध करून द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार पंकज भोयर यांनी माजी सैनिकांचा मेळावा आणि सत्कार कार्यक्रम घेणारे पहिलेच पालकमंत्री आहेत असे गौरवोद्गार काढून सैनिकांना 5 एकर शेत जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर जिल्हाधिकारी यांनी माजी सैनिकांच्या घरासाठी त्यांच्या पसंतीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी खासदार रामदास तडस यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुलगाव कॉटन मिल च्या कामगारांना कॉटन मिल च्या जागेचे सातबारा वाटप करण्यात आले. 1982 पासून रखडलेला हा विषय मार्गी लागला असून 114 कामगारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी देवळी तहसील मधील गुंजखेडा येथील राही रामचंद्र अंबादे , शंकर मेश्राम, मारोती निंबाळकर ,हिरामण साखरे, मोतीराम नांदेकर, अरुण राऊत यांना सातबारा वाटप करण्यात आले.तसेच महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती निमित्त जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी कार्यकर्त्यांना किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शिल्पा खरपकर यांनी केले. संचालन यशवंत देशमुख तर आभार सतोष सामुद्रे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.