समाजातील नकारात्मकतेला गांधीविचार हेच उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:36 PM2019-06-27T21:36:04+5:302019-06-27T21:36:25+5:30
महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली. आज सामाजिक न्यायाचा आवाज क्षीण होत असताना विरोधी आणि नकारात्मक विचारांना उत्तर देण्यासाठी गांधी पुरून उरतो, असे उद्गार अॅड. असीम सरोदे, पुणे यांनी गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे आयोजित व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना काढले.
स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत असीम सरोदे यांनी 'नैतिक न्यायाचा पुरस्कर्ता गांधी' या विषयाची मांडणी केली. गांधींचा लढा हा सुरुवातीपासूनच परिवर्तनासाठी होता आणि त्याच उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी न्यायालयातही विवेकनिष्ठ सत्याचा विचार मांडला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या बॅरिस्टर गांधींनी अर्थार्जनासाठी नव्हे, तर दोन पक्षकारांमधील प्रश्न आपसी सहमतीने, तडजोडीने सुटावेत, या विचारांतून दक्षिण आफ्रिकेत वकिली केली. विचारांची प्रक्रिया ही सतत प्रवाही असते, ती कुणीच थांबवू नये, असे म्हणणारे गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच मांडणी करीत असतात. गांधींनी हिंदू धर्मात प्रथमत: सामूहिक प्रार्थना, सर्वधर्म समभाव प्रार्थना आणली, तो सामाजिक न्यायाचाच प्रयोग होता. गांधींचा सर्वोदयाचा विचारही सामाजिक न्यायाचा विचार आहे. गांधींना या देशाच्या नेतृत्वासाठी चेहराविरहित यंत्रणा अपेक्षित होती. मात्र, आज देशात लोकशाही चालविणारी सुव्यवस्था विकसित होण्याऐवजी यंत्रणेत हस्तक्षेप करणारा चेहराच अधिक प्रभावी ठरतो आहे. या देशात संवैधानिक मूल्यांचा, नैतिक आणि सामाजिक न्यायाचा विचार रुजवायचा असेल तर आता इथल्या अव्यवस्थेवर धडका माराव्या लागतील, असेही सरोदे म्हणाले.
आपल्या सामाजिक व पर्यावरणीय न्यायालयीन लढ्यात गांधींच्या नैतिक न्यायाचे बळ लाभले आहे, हे सांगताना अॅड. सरोदे यांनी अनेक दाखले दिले आणि गांधी आजही समाजासाठी दिशादर्शकच असल्याची जाणीव त्यांनी आपल्या व्याख्यानातून अधोरेखित केली.