वर्धा : वैद्यकीय पाठ्यपुस्तकांत कौमार्याबाबत असलेल्या अवैज्ञानिक बाबी आणि समलैंगिकांसह एलजीबीटीक्यूआयए समुदायाबद्दल अपमानास्पद शेरेबाजी आणि कौमार्याबाबत अवैज्ञानिक माहिती काढून टाकण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) देशातील वैद्यकीय पाठ्यपुस्तकांच्या लेखकांना १३ ऑक्टोबर रोजी दिलेले आहेत, तसेच कोणत्याही पुस्तकात अशी अवैज्ञानिक, अपमानास्पद आणि भेदभाव करणारी माहिती असेल, अशा पुस्तकांना वैद्यकीय विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी शिकवण्याच्या उद्देशाने मान्यता देऊ नये, असेही निर्देश आयोगाने दिलेले आहेत.
वैद्यकीय शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा वाणीकर यांनी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींनुसार हे प्राथमिक निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. समितीमध्ये दिल्ली येथील डॉ. विजयेंद्र कुमार, बंगळुरू येथील डॉ. प्रभा चंद्र, गोरखपूर येथील डॉ. सुरेखा किशोर, तसेच सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. इंद्रजित खांडेकर होते.
लैंगिक अपराधांना नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणून विभागणे, स्त्रिया आणि पुरुषांच्या समलैंगिकतेला अनैसर्गिक लैंगिक गुन्हा, लैंगिक विकृती आणि असामान्य लैंगिक वर्तन म्हणून संबोधणे, समलैंगिक हे असामाजिक असतात, स्त्री समलैंगिक (लेस्बियन) हे पुरुषी बांधणीचे असतात, ते एकमेकांची ईर्ष्या, मत्सर करतात, कधी- कधी ते खून किंवा आत्महत्येपर्यंत पोहोचू शकतात, ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल अशा अनेक बाबी पुस्तकात देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ट्रान्सजेंडरिझमला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणून अभ्यासक्रमात शिकविले जाण्याची गरज आहे.
एलजीबीटीक्यूआयए या समुदायाविषयी वैद्यकीय पुस्तकातील माहिती सुधारण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. कौमार्य या विषयावरील माझ्या अहवालात केलेल्या विनंतीनुसार कौमार्य व कौमार्य चाचणी हा विषयदेखील समितीच्या विषयपत्रिकेत समाविष्ट केला गेला. सरकारचे हे दिशानिर्देश एक महत्त्वाचे मोठे पाऊल आहे.
-डॉ. इंद्रजित खांडेकर, प्राध्यापक, वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम