संदीप तामगाडगे : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कार्यगौरव सोहळावर्धा : शिक्षण म्हणजे केवळ चांगले गूण मिळविणे अशी सर्वसामान्य व्याख्या प्रचलित आहे. त्यामुळे बहुतेक जण मार्क मिळण्यापुरताच अभ्यास करतात. तरंतु असे विद्यार्थी परीक्षांमध्ये भरपूर मार्का मिळवूनही पुढच्या आयुष्यात भरीव कामगिरी बजाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या ध्येयाने स्वत:ला वेडावून घ्या, झपाटून घ्या, मग अख्ख आयुष्य तुमचंच असेल, असे प्रतिपादन पोलीस उप महासंचालक संदीप तामगाडगे यांनी शुक्रवारी केले.न्यु आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज वर्धा येथे महाराष्ट्र राज्य कास्टाईल कर्मचारी कल्याण महासंघ, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना वर्धा, आसमंत फाऊंडेशन, स्पार्क युथ सोशल फोरम, आदिवासी विकास कृती समिती वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी दत्ता मेघे इन्स्टिटयुट आॅफ मेडिकल सायंसेस, सावंगी(मेघे) वर्धाचे उपकुलगुरू डॉ. डॉ. वेदप्रकाश मिश्रा तर अतिथी म्हणून आयकर विभाग उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे उपस्थित होते. कुठलेही ध्येय प्राप्त करीत असताना अचूक ध्येयनिश्चिती फार महत्त्वाची असते. यातूनच अचूक नियोजन करून ध्येयापर्यंत पोहचता येते असे प्रतिपादन नागपूर येथील आयकर विभाग उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर यांनी मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मिश्रा म्हणाले, शाळेतील कामगिरीचा आयुष्यातील यशाशी संबंध नाही. जर तुमच्याकडे काही स्वप्न असेल आणि ते साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तुमच्यात तयारी असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनतीशिवाय यशाची व्याख्याच नसल्याचेही मिश्रा म्हणाले. प्रास्ताविकातून डॉ. प्रशांत कडवे यांनीही विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासाकरिता आपण नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे यांनी केले. आभार डॉ. मदन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
ध्येय निश्चिती व योग्य नियोजन हेच यशाचे गमक
By admin | Published: December 05, 2015 9:08 AM