लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरात ४० हून अधिक खासगी रुग्णालये आहेत. या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यासाठीची व्यवस्था असली तरी मध्यरात्रीच्या सुमारास एखाद्याची प्रकृती बिघडल्यास व रुग्णाला खासगी रुग्णालयात नेल्यास रुग्णालयाचा दरवाजा उघडला जात नाही. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास कुणाची प्रकृती बिघडल्यास रुग्णाला थेट जिल्हा सामान्य रुग्णालयातच न्यावे लागते. मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्याला तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले जाते. गंभीर रुग्णाला दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांत हलविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिका सज्ज असते. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलेला दाखल केल्यास तातडीने डॉक्टरांना पाचारण करून चांगली आरोग्य सेवा दिली जाते. जास्तच गुंतागुंत असल्यास गरोदर महिलेला तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले जाते. रात्री उशिरा काही अपवाद वगळता खासगी रुग्णालयांत आरेाग्य सेवा मिळत नसली तरी शासकीय रुग्णालयात नाममात्र का होईना; पण आरोग्य सेवा मिळत असल्याने गरीब व गरजूंना दिलासा मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा...n रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री उशिराही नागरिकांना चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. शुक्रवार, १५ रोजी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला; पण याच दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्रपाळीवर असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रात्री उशिरा उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे बघावयास मिळाले.
रुग्णालयात अल्प मनुष्यबळ असले तरी कार्यरत मनुष्यबळाच्या जोरावर प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासन करीत आहे.- डॉ. अनिल वानखेडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा