शासकीय कामे उठली नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:14+5:30
अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र, हे काम करताना सुरुवातीपासूनच योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याचे निश्चित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात मागील दीड वर्षांपूर्वीपासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे फोडकाम करण्यात आले तर काही ठिकाणी डांबरी रस्ते खोदून सिमेंटीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र, रस्त्यांची कामे करताना डायव्हर्शन दर्शविणारे फलक बेपत्ता झाले आहेत तर कुठे फलक फाटलेले आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षेविनाच काम सुरू आहे. काम सुरु असलेला रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनधारकांना अपघात झाले असून गंभीर दुखापतही झाली आहे. ‘लोकमत’ने शहरात सुरू असलेल्या कामांवर जात पाहणी केली असता नियोजनाच्या अभावासह सुरक्षेविनाच कामे सुरू असल्याचे दिसून आले.
शहरात दीड वर्षापूर्वी १०१ कोटी रुपये खर्चून अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या कामात कुठेच सातत्य नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावात काम सुरू होते.
मात्र, ते पूर्ण न करताच दुसरीकडे मुक्काम हलविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र, हे काम करताना सुरुवातीपासूनच योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याचे निश्चित आहे. काही भागात भूमिगत गटारच्या कामाची खोली जास्त असल्याने एकाच ठिकाणी यंत्रणा अडकून पडल्याचे दिसते.
पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून जेलरोडकडे जाणाऱ्या मार्गावर भूमिगतचे काम सुरू असून खोदकामातील मलबा रस्त्यावर टाकला असून कुठेही फलक लावलेले नाहीत. किंवा सुरक्षेचा फलकही तेथे लावण्यात आलेला नाही. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. खोदलेला रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनधारकांचे अपघात झाले आहे. जेलरोड कडे जाणाºया मार्गाचेही तेच हाल आहेत.
सेंट अॅन्थोनी शाळेसमोरील एका बाजूचा सिमेंट रस्ता खोदण्यात आला असून कुठलाही सूचना फलक तेथे नसल्याने रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना रस्ता दिसत नसल्याने दररोज अपघात होत आहेत. झाशी राणी चौक ते बजाज चौकाकडे जाणाºया रस्त्यालाही पोखरण्यात आले असून भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यात येत आहे. एकेरी रस्त्यावर वर्दळ असताना सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहने रस्त्याकडेला पडून अपघात होत आहेत. एकंदरीत या शासकीय कामांमुळे नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, कंत्राटदार, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही.
बांधकाम जलवाहिनीचे नुकसान
झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण पूर्णत्वास गेले आहे. दुसºया बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. यात अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नुकत्याच अंथरलेल्या मुख्य जलवाहिनीचे नुकसान होत आहे. काम करताना कंत्राटदाराकडून प्रचंड निष्काळजीपणा केला जात आहे. मात्र, यावरच कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.
‘त्या’ कडा ठरताहेत धोकादायक
धुनिवाले चौक ते आरती चौकापर्यंत एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण पूर्णत्वास गेले आहे. डेरेदार वृक्ष वाचविण्यासाठी चौकटी सोडण्यात येऊन रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. या सिमेंटच्या कडा कित्येक महिन्यांपासून उघड्याच आहेत. या कडांवरून वाहने घसरून दररोज अपघात होत आहेत. जीवघेण्या ठरत असलेल्या या कडा बुजविण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
बांधकाम मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
शहरात नियोजनाच्या अभावातच धडाक्यात विकासकामे सुरू आहेत. कोरोनाचे सावट कायम असताना मास्कविनाच मजूर काम करीत असल्याचे चित्र आहे. मजुरांना सुरक्षा साहित्य पुरविण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोपुरी चौक ते दत्तपूर टी-पॉइंट, धुनिवाले चौक ते आरती चौक, झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान काम रखडले होते. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शासनाने शासकीय, खासगी बांधकामांना परवानगी दिली. रस्त्याचे रखडलेले काम गतीने सुरू झाले.
धुनिवाले चौक ते आरती चौकापर्यंत एकेरी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. सद्यस्थितीत दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. झाशी राणी पुतळ्यापासूनही एकेरी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून दुसऱ्या बाजूने खोदकाम केले जात आहे. रस्ता कामावरील मजुरांना सुरक्षा साहित्य पुरविणे कंत्राटदाराची जबाबदारी आहे.
मात्र, शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता मजुरांकडे हॅण्डग्लोव्हज, बुट, जॅकेट आदी सुरक्षा साहित्य तर नाहीच कोरोनाने थैमान घातले असताना मजुरांकडे मास्कदेखील नाही. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचेही बांधकामाच्या ठिकाणी तीन-तेरा होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अभियंता नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचेही याकडे लक्ष कसे गेले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.