चार जणांना अटक : धान्याची ७१ पोती ताब्यातवर्धा : शासकीय गोदामातील धान्याची बेकायदेशीररित्या साठेबाजी करून ते खुल्या बाजारात चढ्या भावाने विक्री करणाऱ्या चार जणांना धान्य व इतर साहित्यासह विशेष पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा व एफसीआय झोपडपट्टी येथे एकाच वेळी करण्यात आली. बुधवारी दुपारी १२ वाजता केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. सय्यद रहमान सय्यद अयुब (५०), शेख रिझवान शेख रहमान, अजयसिंग राजपूत, सद्दाम खान खैरउल्ला खान अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईत एकूण ७१ पोते गहू व तांदूळ, ३ मोबाईल, एमएच २९ टी ४६८६ आणि एमएच ३२- क्यू १८४९ क्रमांकाचे दोन मालवाहू असा एकूण ५ लाख ८२ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे शासकीय गोदामातील धान्याची बेकायदेशीररित्या साठेबाजी करून ते चढ्या भावाने खुल्या बाजारात विकत होते. ही माहिती मिळताच एफसीआय गोदाम परिसरात छापा मारून त्यांना धान्यासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात वर्धा व पुलगावच्या विशेष संयुक्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, संजय माटे, एस. बी. मुल्ला, जमादार विवेक बनसोड, विवेक हानुले, अभय खोब्रागडे, सुशील सायरे, महेंद्र गिरी, घनश्याम पाटील, दिनेश गायकवाड व श्रीधर उईके यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
काळ्या बाजारातील शासकीय धान्यसाठा जप्त
By admin | Published: June 11, 2015 2:07 AM