बोलक्या भिंती शिल्पाच्या आवारात वाढले गवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:22+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले आहे. या भिंती शिल्पामुळे मेडिकल चौकाचा चेहराही बदलला आहे. परंतु, सध्या या भिंती शिल्पाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत येथील मेडिकल चौकात कस्तुरबा गांधी यांच्या कार्य प्रसंगावर भिंतीशिल्प तयार करण्यात आले आहे; पण याच परिसरात सध्या काटेरी झुडपासह गवत वाढल्याने सुंदर सेवाग्रामच्या उद्देशालाच खो मिळत आहे.
महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे सेवाग्रामला जगात ओळख मिळाली आहे. जगातील अनेक व्यक्तींनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे गांधी विचारांची माहिती जाणून घेतली आहे. शिवाय गांधी विचार कसे फायद्याचे आहे हे पटवून घेतले आहे. महात्मा गांधी यांना स्वातंत्र्य लढ्यात कस्तुरबा गांधी यांनीही मोठे सहकार्य केले. हे वारंवार महात्मा गांधी यांनी कबुलही केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले आहे. या भिंती शिल्पामुळे मेडिकल चौकाचा चेहराही बदलला आहे. परंतु, सध्या या भिंती शिल्पाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात झुडपांसह गवत वाढले असून वेळीय परिसर स्वच्छ करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणी नागरिकांची आहे.
मुख्य उद्देशाला मिळतेय बगल
स्वच्छ आणि सुंदर परिसर या उद्देशाने सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून अनेक विकास कामे सेवाग्राम परिसरात करण्यात आली. परंतु, सध्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने विकास कामाच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.