जलक्रांतीसाठी सरसावले हात
By admin | Published: April 20, 2017 12:48 AM2017-04-20T00:48:12+5:302017-04-20T00:48:12+5:30
सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेंतर्गत येथे ग्रामस्थांच्या मदतीला प्रशासनही धावून आले.
वॉटर कप स्पर्धा : ग्रामस्थांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान
विरूळ (आकाजी) : सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेंतर्गत येथे ग्रामस्थांच्या मदतीला प्रशासनही धावून आले. बुधवारी आर्वी पं.स. गटविकास अधिकाऱ्यासह अंगणवाडी सेविका तथा देवळी पं.स. च्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी विरूळ येथे श्रमदान केले.
येथील ग्रामस्थांनी जलक्रांतीचे तुफान उठविले. या तुफानाला बुधवारी सकाळी ७ वाजता आर्वी पं.स.च्या गटविकास अधिकारी पवार, देवळी पं.स. च्या शिक्षण विभागाचे शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच आर्वीच्या अंगणवाडी सेविकांची साथ मिळाली. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करताना पाहून गावातील शेकडो युवक-युवती, महिला, नागरिकांना हुरूप आला होता. पाहता-पाहता दोन मोठे दगडी बांध, सीसीटी तयार झाले. कुणी झाडासाठी खड्डे खोदत होते तर कुणी या सर्वांकरिता पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था करीत होते. संपूर्ण ग्रा.पं. सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी कामात व्यक्त होते. ग्रामस्थांचा उत्साह पाहून बीडीओ पवार यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामस्थांनी श्रमदानाने गावशिवार जलयुक्त करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. उत्स्फूर्तपणे होणाऱ्या या श्रमदानावरून विरूळवासियांनी गाव पाणीटंचाई मुक्त करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केल्याचे दिसत होते.(वार्ताहर)