पवनार येथील ऐतिहासिक दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 06:45 PM2020-09-19T18:45:12+5:302020-09-19T18:45:38+5:30
वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे. या प्राचीन दिल्ली दरवाजाचे जतन करण्यासाठी पुरातत्व निदेर्शानुसार संरक्षित करण्यात यावी आणि या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करून परिसराचेही सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनद्वारे करण्यात आली आहे.
वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेले पवनार हे गाव प्राचीन संस्कृती व ऐतिहासिक वारसा यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. द्वितीय प्रवरसेन राजाची राजधानी असलेले प्रवरपूर हे आज पवनार या नावाने ओळखले जाते. या गावाचा उल्लेख आईना ए अकबरी या ग्रंथात पनार या नावाने आढळतो. या गावात झालेल्या खोदकामात प्राचीन मूर्त्या अजूनही सापडतात, असे पवनारवासियांनी सांगितले. कधीकाळी या गावाला चहुबाजूने परकोट असल्याने त्याचेही अवशेष येथे आढळून येतात. या परकोटाला असलेल्या चार दरवाजांपैकी केवळ एक दरवाजा शिल्लक असून तो दिल्ली दरवाजा या नावाने ओळखला जातो. या ऐतिहासिक वारशाचा मागोवा घेण्यासाठी नुकतीच बहारच्या अभ्यासकांनी या गावाला भेट दिली.
या भेटीत दिल्ली दरवाजाची दुरवस्था झाली असून एक बाजू अत्यंत नाजूक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. दरवाज्यावर वेली तसेच अवतीभवती झुडुपे वाढलेली आहेत. शिवाय, मानवी हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात असल्याने दरवाज्याला लागूनच बांधलेली गुरे व शेणखताचा मोठा ढीग दिसून आला. या दरवाज्यावर एक शिलालेख असून तो कधीही निखळून पडू शकतो, अशी अवस्था झाली आहे. याची वेळीच दखल घेतली नाही तर या शिलालेखासह एक ऐतिहासिक दस्तावैज नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य वास्तूंमध्ये वापरल्या गेलेले कोरीव दगडही गावात सर्वत्र अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आले आहेत. बहारच्या सदस्यांनी ग्रामवासियांशी संवाद साधला असता गतवैभवाची साक्ष देणाऱ्या या वास्तूचे जतन व्हावे, ही भावना त्यांच्यातही दिसून आली.
या प्राचीन ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासोबतच दरवाज्याच्या भोवतालचा परिसरही संरक्षित करावी, दरवाजासमोरील मोकळ्या जागेत उद्यान निर्माण करावे आणि त्याशेजारीच संशोधनाच्या दृष्टीने एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय उभारून ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या प्राचीन मूर्त्या व अवशेषांचे संकलन करावे, अशी मागणी पवनारभेटीत सहभागी झालेले बहारचे सदस्य संजय इंगळे तिगावकर, प्राचीन वास्तूअभ्यासक आर्किटेक्ट निखिल अवथनकर जैन यांनी केली आहे. या भेटीत स्थानिक नागरिक सुधाकर महाराज, शेख बब्बू व रमेश पलटनकर यांनी सहकार्य केले. या संदर्भात शासनाला निवेदन व प्रस्ताव देणार असल्याची माहिती बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष आर्कि.रवींद्र पाटील, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, वैभव देशमुख, स्नेहल कुबडे यांनी दिली आहे.