शाळा बुडवून नदी परिसरात हुंदड
By admin | Published: October 10, 2015 02:43 AM2015-10-10T02:43:03+5:302015-10-10T02:43:03+5:30
पवनार येथील धाम नदीचा परिसर आणि विनोबा आश्रम पर्यटकांना नेहमी खुणावत असतो.
अनुचित प्रकार घडण्याची शक्यता : सकाळपासूनच विद्यार्थी नदीवर
पराग मगर वर्धा
पवनार येथील धाम नदीचा परिसर आणि विनोबा आश्रम पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. शाळेच्या सहलींनीही हा परिसर नेहमीच गजबजतो. पण याही पुढे जाऊन सध्या धाम परिसरात अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेला दांडी मारून सकाळीच धाम पात्रात हुंदडण्यासाठी येतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा आणि शाळेत न जाता परस्पर बाहेर भटकण्याचा मुद्दा पुन्हा एकवार चर्चेत आला आहे.
काहीच दिवसांपूर्वी दोन शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करून दोन मुले वारंवार त्यांना पवनार येथे आणून त्यांच्याशी गैरवर्तवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले. महिला पोलीस पथकाच्या वतीने वेळीच कार्यवाही करून त्या मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ जरी टळला असला तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. सध्या शाळा बुडवून सकाळी सकाळी पवनार येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले येत असतात. यातील बरेच विद्यार्थी हे आसपासच्या गावातील असून सायकलने ते पवानारला येतात. ही मुले शाळेत जाण्याचे निमित्त करून सकाळीच सरळ पवनार येथे येतात. त्यातही येताना खाण्यापिण्याचे जिन्नस घेऊन येत येथे छोटेखानी पार्टी करतात. त्यानंतर शाळा सुटण्याची वेळ होतपर्यंत ही लहान मुले येथे पाण्यात खेळत बसतात आणि त्यानंतर काही वेळाने घरचा रस्ता धरतात. यात काही जण चांगले पट्टीचे पोहणारेही आहेत. त्यामुळे ते पोहण्याचा आनंद घेत बसतात. परंतु अनेकदा पोहता येत नसलेली मुलेही हिम्मत करून पाण्यात उतरून प्रसंगी आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर उपस्थित होतोच पण शाळा बुडवून हा प्रकार होत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा आणि पालकांच्या व शिक्षकांच्या डोळ्यातील धूळफेक आदी मुद्दे उपस्थित होत आहेत.
काहीच दिवसांपूर्वी दोन युवकांवर शाळकरी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तवणूक करताना आढळले. महिला पथकाला ही बाब निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई केली असली तरी यापूर्वीही अनेकवेळा त्यांना पाहिल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा विचार करता पालकांनी व शाळांनी मुलांच्या गैरहजेरीची योग्य दखल घेत यावर वचक बसण्यासाठी मुलांना असे हुंदडण्यापासून रोखणे गरजेचे आहे.